अधिवेशन काळात सहकारी सूत गिरण्यांच्या अडचणींवर उच्चस्तरीय बैठक
मुंबई :
राज्यातील उत्पादनाखालील व उभारणीतील सहकारी सूत गिरण्यांच्या विविध अडचणींबाबत अधिवेशन काळात उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा करण्यात आली.
महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी राज्यातील सहकारी सूत गिरण्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे निवेदन मंत्र्यांसमोर सादर केले. वीजदर, कर्जव्यवस्था, यंत्रसामग्री अद्ययावत करणे, कच्चामाल उपलब्धता तसेच प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
या निवेदनाची सकारात्मक दखल घेत अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांच्या सचिवांसह उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
बैठकीस माजी मंत्री व आमदार नितीन राजळे, आमदार अशोक माने, आमदार प्रताप अडसड, उपाध्यक्षा साविता सोनवणेकर, संचालक किसनराव कुराडे, माजी मंत्री रमेश बंग, रणजित देशमुख, विरेंद्र गजभिये, सचिव संभाजी देसाई तसेच तांत्रिक अधिकारी अमर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मागासवर्गीय सूत गिरण्यांच्या प्रश्नांवर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत स्वतंत्र चर्चा करण्यात आली. सर्व समस्या ऐकून घेऊन अधिवेशन काळात संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळून उद्योगाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांना निवेदन देताना अशोक स्वामी,आ.अशोकराव माने व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










