‘माझी वसुंधरा’ अभियानात इचलकरंजी महापालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक; ७ कोटींचे बक्षीस जाहीर-महापौर उदय धातूंडे
इचलकरंजी :
महाराष्ट्र शासनच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत इचलकरंजी महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याबद्दल महापालिकेला ५ कोटी रुपये तसेच भूमी विभागात विशेष कार्य केल्याबद्दल अतिरिक्त २ कोटी रुपये असे एकूण ७ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली.
पर्यावरण संरक्षण, हवामान बदल आणि शाश्वत विकास या संकल्पनांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये मागील पाच वर्षांत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यासाठी नियुक्त पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून गुणांकन केले.
१ लाख ते ३ लाख लोकसंख्या गटातील शहरांमध्ये सातारा नगरपालिकेला प्रथम, इचलकरंजी महानगरपालिकेला द्वितीय तर बार्शी नगरपालिकेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. इचलकरंजीत उभारण्यात आलेला ऑक्सिजन पार्क, विविध उद्यानांचे सुशोभीकरण, वृक्षारोपण मोहिमा तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनी सांगितले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळेच शहराला हा मान मिळाला आहे. उपायुक्त नंदू परळकर यांनी जाहीर झालेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीतून भविष्यात अधिक पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे, उद्याने विकसित करणे आणि व्यापक वृक्षारोपण मोहिमा हाती घेण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी नगरसेविका सपना भिसे, प्रमोद बचाटे आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









