कामगारांना हक्काची घरकुले; महिलांसाठी आधुनिक यंत्रमाग प्रशिक्षण केंद्र – प्रकाश आवाडे
इचलकरंजी :
वस्त्रोद्योगातील सर्व कामगारांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घरकुल देण्यात येणार असून महिलांसाठी डीकेटीईच्या माध्यमातून साध्या यंत्रमागापासून ते एअरजेट लूमपर्यंतचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली. राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटना (इंटक) प्रांगणात कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.
इचलकरंजी हे ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ असून येथे सुमारे ८० हजार यंत्रमाग कामगार कार्यरत आहेत. यापैकी ४० ते ५० टक्के कामगार भाड्याच्या घरात राहतात. या कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेतून ३२५ स्क्वेअर फुटांची घरकुले उपलब्ध करून दिली जाणार असून प्रति घर सुमारे ९ लाख खर्चात २ लाख रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे. अतिरिक्त १ लाख अनुदानासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली नाका–टाकवडे रोड परिसरात पहिल्या टप्प्यात ४५० घरकुलांचा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याची माहिती ७ मे रोजी राजीव गांधी भवन येथे दिली जाणार आहे. महिलांना रॅपिअर व एअरजेट लूमचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यावरही भर देण्यात येणार आहे.
यावेळी इंटकचे पदाधिकारी, कामगार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंटक संघटनेतर्फे आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







