ICHMH51NEWS.IN
9921600800

मा.सुरेशरावजी हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन- सुनील महाजन 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मा.सुरेशरावजी हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन- सुनील महाजन 

इचलकरंजी :

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मा. सुरेशरावजी हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी शहर व विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांनी युक्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत सुनील महाजन यांनी दिली. २९ मे ते ७ जून या कालावधीत हा सेवा सप्ताह राबविण्यात येत असून नागरिकांनी विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाढदिवस उत्सव समितीने केले आहे.

सेवा सप्ताहांतर्गत स्मार्ट सोलर योजना व एस.टी. स्मार्ट कार्ड शिबिरे, स्वच्छता मोहीम, चपाती-भाजी वाटप, आयजीएम रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, विविध भागांत मोफत शिवभोजन, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, भाजपा कार्यालयात पाणी फिल्टरचे उद्घाटन तसेच संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, महानगरपालिका शाळांतील व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे २५ हजार वह्या व पुस्तकांचे वाटप, अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण, चित्रकला व निबंध स्पर्धा, अन्नदान, संकष्टी चतुर्थीनिमित्त वरदविनायक मंदिर परिसर व पंचगंगा नदीकाठी फराळ वाटप, रिक्षाचालकांना मोफत रेनकोट वितरण तसेच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय शंभूतीर्थ येथे छत्रपती संभाजी महाराज सामूहिक ध्येयमंत्र कार्यक्रम, शिवतीर्थ येथे शिवदीपोत्सव होणार असून सेवा सप्ताहातील प्रमुख आकर्षण म्हणून दि. ३ जून रोजी पंचगंगा नदी घाट येथे साईप्रसाद ग्रुपच्या वतीने भव्य महागंगा आरती व महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने ५०० मुलांना गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमांची माहिती देताना साईप्रसाद ग्रुपचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी तानाजी पोवार यांनी हाळवणकर साहेबांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले असून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. गटनेते विठ्ठल चोपडे यांनी विविध कार्यक्रमात सर्वानी सामील व्हावे असे सांगितले. शशिकांत मोहिते यांनी विविध प्रभागातून ४ मुख्य कार्यक्रमासह ४५ उपक्रम सेवा सप्ताहात राबविले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी विनय महाजन, मारुती पाथरवट, इम्रान बागवान, जयेश बुगड, राजू भाकरे आदी उपस्थित होते.

भव्य महायज्ञ व गंगा आरती ३ जून रोजी.

माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा नदी घाट येथे बुधवार दि.३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता महायज्ञ व ७ वाजता भव्य गंगा आरती होणार आहे. राजस्थानहून सात पंडित तर गंगा आरतीसाठी २५ जण सहभागी होणार आहेत. इचलकरंजीच्या समृद्धी व औद्योगिक शांततेसाठी नऊ स्टेजवरून आरती केली जाणार आहे. महायज्ञासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून ‘मुठभर धान्य’ संकलित करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री साईप्रसाद ग्रुपचे संस्थापक सुनील महाजन यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा