आठवड्याभरात इचलकरंजीच्या रस्त्यावर ई-बस धावणार; पहिल्या टप्प्यात १० ते १२ बस रवाना – अरुणा बचाटे
इचलकरंजी, ता. ५ : इचलकरंजी शहरासाठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या २५ ई-बसपैकी पहिल्या टप्प्यातील १० ते १२ ई-बस पुढील एक-दोन दिवसांत इचलकरंजीकडे रवाना होणार असून आठवड्याभरात शहराच्या रस्त्यावर ई-बस धावू लागतील, अशी माहिती परिवहन समिती सभापती अरुणा प्रमोद बचाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर उदय धातूंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, गटनेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक मनोज हिंगमिरे, शशिकांत मोहिते तसेच प्रमोद बचाटे उपस्थित होते.
अरुणा बचाटे म्हणाल्या की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेबीएम कंपनीसोबत करार झाल्यानंतर ई-बस प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. बससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू असून बस डेपो आणि बसथांब्यांना नावे देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरात माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी उभारलेल्या ‘सहवास कट्ट्यांचा’ बसथांबे म्हणून वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर उदय धातूंडे यांनी बसस्थानकासमोरील फेरीवाला प्रश्नावर प्रशासन आणि संबंधितांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच समन्वयातून तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.
उपमहापौर अनिल डाळ्या यांनी परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून अल्पावधीत ई-बस योजना प्रत्यक्षात आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शहरात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





