ICHMH51NEWS.IN
9921600800

२ कोटी २५ लाखांच्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी मोहसीन मणेर इंदौरमधून अटक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

२ कोटी २५ लाखांच्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी मोहसीन मणेर इंदौरमधून अटक

इचलकरंजी :

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ८ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून तब्बल २ कोटी २५ लाख ५७ हजार ९७२ रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘ट्रेडिंग पॉईंट’चा मुख्य आरोपी मोहसीन कादर मणेर (वय ३६, रा. आयकॉन पार्क, आमराई रोड, इचलकरंजी) याला शिवाजीनगर पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदौर येथून अटक केली.
मोहसीन मणेर याने कोल्हापूर रोडवरील सोन्या मारुती मंदिरासमोर ‘ट्रेडिंग पॉईंट’ या नावाने कार्यालय सुरू केले होते. शेअर मार्केटबाबत माहिती देत आपल्याकडे रक्कम गुंतवल्यास दरमहा ८ टक्के नफा मिळेल, असे सांगून त्याने अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.
सन २०२२ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गुंतवणूकदारांकडून रोख रक्कम तसेच एचडीएफसी बँक, इचलकरंजी येथील ‘ट्रेडिंग पॉईंट’च्या खात्यावर चेक व बारकोडद्वारे मोठ्या रकमा स्वीकारण्यात आल्या. गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित असल्याचे भासविण्यासाठी करारपत्रे करून देण्यात आली. सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात परतावा देण्यात आला; मात्र त्यानंतर ना परतावा देण्यात आला ना गुंतवणुकीची मूळ रक्कम परत करण्यात आली. याप्रकरणी ३ जून २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी मोहसीन मणेर फरार होता. त्याचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना बातमीदारांकडून तसेच तांत्रिक तपासातून आरोपी इंदौर, मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीस अधीक्षकांची परवानगी घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक माने व पोलीस अंमलदार राहुल कामत यांचे पथक इंदौरला रवाना झाले. पथकाने वेषांतर करून काही दिवस इंदौरमध्ये राहून आरोपीच्या ठिकाणाची खात्री केली. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२६ रोजी निपानिया, इंदौर येथून मोहसीन मणेर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच फसवणुकीची रक्कम कुठे वळविण्यात आली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल भा.पो.से., अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक दीपक माने, पोलीस अंमलदार किशोर सूर्यवंशी, रणवीर जाधव व राहुल कामत यांनी केली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा