अवघ्या १० तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; बहिणीच्या मैत्रिणीला अटक
जयसिंगपूर प्रतिनिधी :
जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील दानोळी येथे घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या १० तासांत छडा लावला. या प्रकरणी तन्वी सुहास लेले (वय २३, रा. दिशा चैत्रबन अपार्टमेंट, नक्षत्रवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) हिचे नाव निष्पन्न झाले आहे.
सुभाष रामचंद्र पवार (रा. चांदोली वसाहत, जैनापूर, ता. शिरोळ) यांच्या दानोळी येथील घरातून ऑगस्ट २०२५ ते २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंतच्या कालावधीत वेळोवेळी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गणेशोत्सव बंदोबस्तात पोलीस व्यस्त असतानाही गुन्हे शोध पथकाने घरातील सदस्य तसेच परिसरातील नागरिकांकडे कसून चौकशी केली. तपासादरम्यान फिर्यादी यांच्या घरात काही दिवसांपासून वास्तव्यास असलेली त्यांच्या बहिणीची मैत्रीण तन्वी लेले हिच्यावर संशय बळावला. चौकशीत तिने चैनीच्या गरजा भागविण्यासाठी घरातील दागिने वेळोवेळी चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने मुथूट फिनकॉर्प, विश्रामबाग शाखेत तारण ठेवून पैसे घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. दागिने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परि. उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश गवई, पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, हवालदार महेश कोरे, सुनिल बाईत, आशुतोष कोळी व जावेद आंबेकरी यांनी कारवाई केली. पुढील तपास हवालदार महेश कोरे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800


