सेवा संकल्प अभियानांतर्गत इचलकरंजीत ई-बाईक व बाईक रॅली
इचलकरंजी :
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी ई-बाईक व बाईक रॅली उत्साहात काढण्यात आली. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक, इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा रॅलीचा उद्देश होता.
महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीपासून स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेवक राजू बोंद्रे, उपायुक्त विद्या कदम व सहा आयुक्त रोशनी गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. शिवतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक, नाट्यगृह, चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, तीन बत्ती चार रस्ता चौक आणि छत्रपती शाहू महाराज पुतळा चौक या प्रमुख मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करत पुन्हा महानगरपालिका कार्यालय परिसरात आली.
रॅलीमध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीदरम्यान सेवा संकल्प अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. ई-बाईकसारख्या पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढविणे, इंधनाची बचत करणे तसेच शहरातील प्रदूषण कमी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
रॅलीमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर सेवा संकल्प अभियानाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
यावेळी सहा आयुक्त सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, नितीन बनगे, नगरसचिव राहुल पोटे, क्रीडा अधिकारी संजय शेटे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


