इचलकरंजीत बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई – ५.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी:
अवैध दारूविक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, इचलकरंजीच्या पथकाने मोठी कारवाई केली. हॉटेल जलजा पॅलेसजवळ रोडवर संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू साठा सापडला.
दुपारच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, इचलकरंजीचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले आणि त्यांच्या पथकाने इचलकरंजी शहरात पेट्रोलींग सुरू केले होते. एस.टी. स्टँड ते डेक्कन चौक या परिसरात गस्त घालत असताना हॉटेल जलजा पॅलेसजवळ एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, वाहनात मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारू आढळली.
या प्रकरणात आरोपी दिग्विजय उर्फ विजय दिलीप पांढरपट्टे (वय ३१, रा. गणेशनगर, ग.नं.९, शहापूर, इचलकरंजी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एकूण ५,४४,८६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या ७२० बाटल्या, मोबाईल आणि एक शेव्हरलेट कंपनीची चारचाकी वाहन यांचा समावेश आहे.
सदर माल हा संजोग वाईन्स, इचलकरंजी येथून हॉटेल जलजा येथे विक्रीसाठी नेला जात असल्याचे तपासात उघड झाले. आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ख) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
या कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले, पो.हे.कॉ. पाटील, हारगुले, पो.कॉ. शेख, कट्टी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









