इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगाचे केंद्रबिंदू ठरणार – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची स्पष्टोक्ती
इचलकरंजी:
इचलकरंजी शहराला केंद्रबिंदू मानून वस्त्रोद्योगात आवश्यक सुधारणा करून त्याला अधिक चालना दिली जाईल असे स्पष्ट मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले. ते येथे पॉवरलूम असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ‘ओम’ या नव्या ब्रँडचे अनावरण करण्यात आले. वस्त्रोद्योगातून निर्यात वाढवण्यासाठी हा ब्रँड उपयुक्त ठरेल, असे सांगून उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रास्ताविक करताना केंद्र व राज्य सरकार वस्त्रोद्योगासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आमदार राहुल आवाडे यांनी क्षेत्रातील समस्या मंत्री सिंह यांच्यासमोर मांडल्या.
खासदार धैर्यशील माने यांनी “इचलकरंजीसाठी साध्या यंत्रमागासाठी विशेष तरतूद व्हावी,” अशी मागणी करत, ‘लाडकी यंत्रमाग योजना’ जाहीर करण्याचे सुचवले. तसेच शहरात प्रोसेस हाऊस, लॉजिस्टिक पार्क, टेस्टिंग लॅब उभारण्याची मागणी त्यांनी केली.
माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी वीजप्रश्न सौर ऊर्जेच्या माध्यमातून मार्गी लावून तीन रुपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा मिळावा अशी मागणी केली. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी इचलकरंजीसारख्या प्रगतशील शहराला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
खासदार धनंजय महाडिक यांनी, “वस्त्रोद्योगाचे नवीन प्रयोग इतरत्र करण्याऐवजी इचलकरंजीसारख्या प्रगत क्षेत्रातच करावेत,” असे मत मांडले.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी, “२०२३-२८ चे वस्त्रोद्योग धोरण हे सक्षम असून, मागणीनुसार त्यात सुधारणा केली जाईल,” असे स्पष्ट केले. तसेच, “वीजपुरवठा मोफत करण्याची शक्यता अभ्यासाधीन असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यावर काम सुरू आहे,” असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अमेरिकेचा चीनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, भारताने आपली क्षमता वेळीच विकसित केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा होईल. यूपीए सरकारच्या काळात ३३ लाख शिलाई मशिन आयात झाल्या होत्या, तर मोदी सरकारच्या काळात ही संख्या १ कोटीवर पोहोचली आहे. भारतात उत्तम दर्जाचे कापड तयार होत असून, केंद्र सरकार राज्य सरकारच्या सहकार्याने या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर मदत करणार आहे,” असे सांगून इचलकरंजी शहरास वस्त्रोद्योगाचे केंद्रबिंदू म्हणून विकसित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर बिहारचे आ.सर्वेश,सुनील पाटील,रफीक खानापूरे यांच्याह मान्यवर उपस्थित होते.
विविध कापडाच्या ब्रॅंडचे स्टॉल प्रवेशद्वारात लावण्यात आले होते,यावेळी वस्त्रोद्योग क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
फोटो-
ओम ब्रँडचे अनावरण करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, ना.संजय सावकारे,धैर्यशील माने,धनंजय महाडिक,राहुल आवाडे,प्रकाश आवाडे,सुरेश हाळवणकर,चंद्रकांत पाटील व इतर
उद्योजकांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीराज सिंह
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








