इचलकरंजीत भव्य तिरंगा एकता रॅली
सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन : अडीच किलोमीटरचा ध्वज
इचलकरंजी:
तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा, हातात राष्ट्रध्वज घेत नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि पाकिस्तान विरुध्द तीव्र संतापासह निषेधाच्या घोषणा देत अन् भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत वस्त्रनगरी इचलकरंजीत शनिवारी भव्य अशी ‘तिरंगा एकता रॅली’ काढण्यात आली. या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोच्या संख्येने सामुहिक सलामी देण्यात आली.
काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आंतकवादी हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकचे कुटील मनसुबे धुळीस मिळवले. भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनिय असून या जवानांचे मनोबल वाढविणे हे आपले कर्तव्य असल्याने इचलकरंजीत ‘तिरंगा एकता रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा, सर्वांच्या हाती राष्ट्रध्वज व परिधान केलेल्या तिरंगी टोप्या यामुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता.
रॅलीच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुभेदार जयपाल कोरेगांवे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहर अध्यक्ष पै. अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, अहमद मुजावर, सौ. अलका स्वामी, सौ. मौशमी आवाडे, मिश्रीलाल जाजू, विजय भोजे, श्रीरंग खवरे, अनिल डाळ्या, धोंडीराम जावळे आदींसह मान्यवर होते. यावेळी सेना आणि सुरक्षा दलांना मोकळीक दिल्याबद्दल आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल लष्कर आणि सुरक्षा दलांचे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.
मुख्य मार्गावरुन कॉ. मलाबादे चौकातून एकेरी मार्गातून श्री शिवतीर्थ येथे आल्यानंतर सुभेदार जयपाल कोरेगांवे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पहलाग हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटक व जवानांना दोन मिनिटे स्तब्धता पाळत श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर वंदेमातरम होऊन रॅलीची सांगता झाली. यामध्ये माजी सैनिकांसह तरुण, महिला, विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनी, खेळाडू, नागरिक राष्ट्रध्वजासह मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
तिरंगा रॅलीत सहभागी आ.राहुल आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,श्रीरंग खवरे,राजु बोंद्रे, शेखर शहा व नागरिक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








