बांगलादेशी आयातीवर निर्बंधाचे पॉवरलुम असोसिएशनकडून स्वागत- चंद्रकांत पाटील
इचलकरंजी
बांगलादेशातून आयात होणारे कापड, तयार कापडे, होजिअरी, महिलांची वस्त्र प्रावरणे यास भारत सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
गेली अनेक दिवस दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन चिनी निर्मीत कापड व त्यापासून तयार होणारे कापडे तसेच होजिअरी बांगलादेश मार्गे आयात शुल्क माफीच्या योजनेआंतर्गत भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येत होते त्यास विरोध करीत आलेला आहे. भारत व सार्क देशांतर्गत आयात-निर्यात करारानुसार आयात शुल्क माफीमध्ये वस्तुंची आयात-निर्यात केली जात होती. याचा गैरफायदा घेऊन चिनी कापड बांगलादेशमार्गे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येत होते. याचा मोठा फटका भारतातील वस्त्रोद्योजकास बसत होता. या आयात-निर्यात धोरणानुसार स्वत:च्या देशात उत्पादित झालेला माल या योजनेअंतर्गत निर्यात करता येणार होता. परंतू दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन व पिडीक्सील यांनी अभ्यासपूर्वक दिलेल्या निवेदनामध्ये बांगलादेशमध्ये फक्त १७००० पॉवरलूम आहेत. परंतू दररोज लाखो मीटरकापड व कापडे भारतामध्ये आयात होत आहेत. हे आयात-निर्यात धोरणाचे उल्लंघन असलेचे वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय मुंबई, वस्त्रोद्योग मंत्रालय दिल्ली तसेच वस्त्रोद्योग मंत्री यांच्यापर्यंत पोहोचविले होते. त्याचबरोबर ना. सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान यांच्या समोर सादरीकरण करून त्याची माहिती दिलेली होती. व बांगलादेश मार्गे येणारे वस्त्रोद्योग घटक आयात शुल्क लावूनच भारतात येऊ द्यावे असे निवेदन केले होते. परवाच इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग मंत्री मा.गिरिराज सिंग आले असताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने जे निवेदन दिलेले आहे. त्यामध्ये या आयात-निर्यात धोरणाचा फेरविचार करावा व बांगलादेशमधून आयात होणाऱ्या कापडावर त्वरीत बंद घालावी अशी विनंती करणेत आली होती.
सध्याची दक्षिण आशियातील युद्धजन्य परिस्थितीतील व्यापार त्याचबरोबर देशांतर्गत वस्त्रोद्योगाची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन भारत सरकारने बांगलादेशमार्गे येणारे सर्व वस्त्रोद्योग घटक भारतामध्ये आयात करणेस बंदी घातली आहे. इतर देशांना जाणारे वस्त्रोद्योग घटक आता फक्त जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई येथे येऊन पुढे रवाना होतील. इतर कोणत्याही बंदरामध्ये बांगलादेशी कंटेनर पुढील वाहतुकीसाठी येणार नाहीत. यामुळे आता भारतातील वस्त्रोद्योगातील लघू उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. १४० कोटी जनतेची बाजारपेठ पूर्णपणे भारतातील सुक्ष्म व लघू उद्योजकांना उपलब्ध होणार आहे. अनुदानीत चिनी कापड व त्यापासून बनणारे स्वस्त उत्पादने भारतामध्ये मिळत असलेने स्थानिक उद्योजकांची विक्री कमी झाली होती. उदाहरणदाखल इचलकरंजीतून कलकत्ता बाजारपेठेमध्ये जाणारे कापड किमान ६०% ते ७०% ने कमी झालेले होते. कारण बांगलादेशी कापड व प्रावधाने स्वस्त दरात उपलब्ध होत होती. कलकत्ता बाजारपेठ ही भारतातील फार मोठी बाजारपेठ आहे. उत्तर पूर्व भारतातील बंगालसह सर्व राज्यांची खरेदी ही कलकत्ता बाजारपेठेतून होते. आता या निर्णयामुळे ती संपूर्ण बाजारपेठ भारतातील वस्त्रोद्योजकांना खुली होणार आहे. त्यामुळे यानिर्णयाचे स्वागत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







