शिवप्रतिष्ठान तर्फे देवदर्शन पदयात्रा संपन्न.
इचलकरंजी:
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, इचलकरंजी शाखेतर्फे हिंदवी स्वातंत्र्यदिन अर्थात श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच सोमवार, ९ जून रोजी देवदर्शन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची गौरवशाली परंपरा स्मरणात ठेवून, आत्ताच्या स्वराज्याचे हिन्दवी स्वराज्यात रुपांतर व्हावे या संकल्पनेने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गजानन महाजन गुरुजी, मधुकर मुसळे, बाळासाहेब ओझा, संतोष सावंत, राजू बोंद्रे, सतिश मुळीक, सुनिल इंगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला.
पदयात्रेला येथील श्रीशिवतीर्थ येथून प्रारंभ होऊन कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी चौक, झेंडा चौक, महादेव मंदिर, अंबाबाई मंदिर अशी विविध ठिकाणी देवदर्शन घेण्यात आले. यानंतर श्रीशिवतीर्थ येथे महाजन गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचा समारोप करण्यात आला.
राज्याभिषेकाच्या दिवशी रायगडावर पारंपारिक धार्मिक विधी, सप्तसिंधु सप्तगंगांच्या जलांनी श्रीशिवरायांचा राज्याभिषेक झाला होता, त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करूनच ही यात्रा काढण्यात आली. भगवा ध्वज अग्रभागी असून, सर्व धारकऱ्यांनी भगव्या फेटे बांधून यात्रा भगवेमय केली होती. या यात्रेत मोठ्या संख्येने शिवपाईक व धारकरी सहभागी झाले होते.
Advt
छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक जिजामाता आणि रायगडावरील शिर्काई, मारुती, जगदीश्वर, भवानी, गणपती यांच्या आशीर्वादाने शिवराज्याभिषेक घडला होता, त्या परंपरेनुसार गावातील ग्रामदैवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा निघाली होती. यामुळे शिवप्रेमींचा मोठा उत्साह दिसून आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







