प्रबोधन प्रकाशन ज्योती द्वारे वाचकांना सकस वैचारिक शिदोरी-सरोज पाटील
इचलकरंजी:
सातत्यपूर्ण काम करणारी समाजवादी प्रबोधिनी ही संस्था गेली अठ्ठेचाळीस वर्षे विविध उपक्रमांच्याद्वारे लोकप्रबोधनाचे जे काम करत आहे त्याचे महत्त्व मोठे आहे. आणि प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे “प्रबोधन प्रकाशन ज्योती “मासिकाच्या माध्यमातून लोकप्रबोधन चळवळीला जी सकस वैचारिक शिदोरी मिळते आहे ती अनमोल स्वरूपाची आहे. कालवश आचार्य शांताराम गरुड ,प्रा. डॉ. एन. डी. पाटील, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या विचाराने या संस्थेची स्थापना केली तो विचार आजच्या अस्वस्थ वर्तमानात अतिशय महत्त्वाचा आहे. या कामात गेली चाळीस वर्षे पूर्ण वेळ कार्यरत असलेले प्रसाद कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय उत्तम काम करीत आहेत.
परिवर्तनाशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने समाजवादी प्रबोधिनीच्या उपक्रमात सहभागी होत सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे. तसेच प्रबोधन प्रकाशन ज्योती या मासिकाचे वर्गणीदार वाचकही झाले पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील उर्फ माई यांनी व्यक्त केले. त्या समाजवादी प्रबोधिनीच्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ” मासिकाच्या २०२५ ( अंक क्रमांक ४५१) चे प्रकाशन करताना बोलत होत्या. या अंकाचे प्रकाशन सरोज पाटील उर्फ माई आणि प्रा.डॉ.एन.डी.पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते माईंच्या निवासस्थानी झाले. स्वागत व प्रास्ताविक संपादक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रबोधिनीचे सहसचिव प्राचार्य डॉ.टी. एस.पाटील, एम.बी.शेख,ॲड.अजित सूर्यवंशी, संजय संकपाळ,प्रा. एकनाथ पाटील,डॉ.अशोक चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. या अंकामध्ये विज्ञाननिष्ठा रुजविण्यासाठी अथक कार्यरत असलेले थोर वैज्ञानिक प्रबोधक डॉ.जयंत नारळीकर यांच्यावरील खास लेखासह विविध विषयांवर प्रसाद कुलकर्णी, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.दशरथ पारेकर ,प्राचार्य आनंद मेणसे, डॉ .संजीव चांदोरकर, डॉ. रफिक सुरज यांचे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयावरील लेख आहेत.
प्रबोधन प्रकाशन ज्योतीच्या ४५१ व्या अंकाचे प्रकाशन करताना सरोज पाटील व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







