श्रद्धा अकॅडमी मध्ये जमावाची तोडफोड,१५ जणांविरोधात गुन्हा दाखल
इचलकरंजी:
श्रद्धा अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर संतप्त जमावाने अकॅडमी परिसरात जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत विद्यार्थी यश अजित यादव (वय १७, रा. पलूस, जि. सांगली; सध्या रा. सुतार मळा, इचलकरंजी) हा श्रद्धा अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता.१७ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजता भंडारे हॉस्टेलमधील बाथरूममध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप निर्माण झाला.
सायंकाळी रिक्रेशन हॉल परिसरात श्रद्धा अकॅडमीजवळ मोठा जमाव जमा झाला. आरोपींनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत हातात लाठ्या-काठ्या घेऊन अकॅडमीवर दगडफेक केली. यामध्ये अकॅडमीच्या इमारतीचे काच फुटणे, झाडांची मोडतोड व डिजिटल बोर्ड फाटणे अशा स्वरूपाचे अंदाजे ४०,०००/- चे नुकसान झाले आहे.
यामध्ये राहुल राजीव आवळे, इंद्रजित घोरपडे, संतोष आवळे, जमिल सादिक मोमीन, आर्यन लोखंडे, वैभव पावते, पवन तडाखे, सतिश आवळे, अजित भोरे, वसिम कलावंत, महेश केंगार, किशोर आवळे, दस्तगीर बागवान, अमर आळंदे, आणि सचिन कुंभार (सर्व रा. इचलकरंजी व परिसर). यांच्याविरोधात शिपाई आदित्य मारुती दुंडगे यांनी फिर्याद दिली असून, इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







