ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पोलीस दलातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा; ‘नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी संधी’ – डॉ. शिरीष शितोळे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पोलीस दलातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा; ‘नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी संधी’ – डॉ. शिरीष शितोळे

इचलकरंजी :

“नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मेहनतीची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे ‘नापास’ होण्याचा शिक्का शालेय जीवनातून हद्दपार होईल. केवळ पदवी असून उपयोग नाही, रोजगारक्षम असाल तरच नोकरी मिळेल. आणि माणसाने माणसाशी जोडून राहणे हेच भविष्यात सर्वात महत्त्वाचे ठरेल,” असे स्पष्ट प्रतिपादन मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिरीष शितोळे यांनी केले.

ते कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित जिल्ह्यातील पहिल्या करिअर मार्गदर्शन कार्यशाळा या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार होते.

Advt

कार्यशाळेतील दुसरे प्रमुख वक्ते समुपदेशक ए. एस. केसरकर यांनी विद्यार्थ्यांना आत्मचिंतन आणि विवेकी विचार करण्याचा सल्ला दिला. “आज मोबाईलचा वापर ज्ञानासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक होत असल्यामुळे संवादावर आक्रमण होत आहे. मेंदूला विचार करायला वेळ मिळत नाही. परिणामी, विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. खरा शिक्षक विचार करायला शिकवतो आणि असे शिक्षक घडले पाहिजेत,” असे केसरकर यांनी ठामपणे नमूद केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी विद्यार्थिनींसाठी विशेष संदेश दिला. ते म्हणाले, “मुलींनो, घाबरू नका. तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तर ठामपणे सांगा – माझे ‘एसपी मामा’ आहेत. पोलीस तुमच्यासोबत आहेत. अडचण असल्यास संवाद साधा आणि हेल्पलाइनवर संपर्क करा. पोलीस तत्पर मदतीसाठी असतील.”

यावेळी त्यांनी ९८२२७६६१०० हा विशेष हेल्पलाइन क्रमांक संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केला व विद्यार्थ्यांनी किंवा नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी केले. पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले.

ADvt

या कार्यशाळेसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पो.नि. दिलीप पवार, गावभागचे पो.नि. महेश चव्हाण, शहापूरचे पो.नि. सचिन सूर्यवंशी यांच्यासह शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक व शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार.

मार्गदर्शक शिरीष शितोळे,अशोक केसरकर यांच्यासह पोलीस दल.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा