इचलकरंजीत कामगारांसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची पॉवरलूम असोसिएशनची मागणी
इचलकरंजी:
इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमाग, एअरजेट व रॅपिअर उद्योगांना कामगार टंचाईचा सामना करावा लागत असून त्यामागे सुलभ प्रवासाची अनुपलब्धता हे एक मुख्य कारण ठरत आहे. विशेषतः हे उद्योग परप्रांतीय कामगारांवर अवलंबून असल्यामुळे, त्यांच्या ये-जा सुविधांवर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने आमदार राहुल आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, बिहार आणि उत्तर प्रदेश मधून कोल्हापूरपर्यंत व ओडिशाच्या राजधानी भुवनेश्वरहून कोल्हापूरपर्यंत अशा दोन रेल्वे सेवा आठवड्यातून किमान दोन दिवस नियमित सुरू करण्यात याव्यात. अशा सेवा सुरू झाल्यास परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी थेट व सुलभ प्रवास करता येणार आहे, तसेच त्यांना पुन्हा इचलकरंजीत वेळेत कामावर हजर होता येईल.
Advt
यासोबतच उत्तर प्रदेश व बिहार मधील अयोध्या, बनारस, मथुरा, वाराणसी, पटणा, गया आणि ओडिशातील जगन्नाथपुरी या धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या भाविकांनाही कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी थेट सेवा उपलब्ध होईल, असा उद्देशही या मागणीमागे आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावी अशी विनंती केली. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, चंद्रकांत भोपळे, पांडुरंग सोलगे, सुभाष बलवान, किरण पोवार, राजाराम गिरी, प्रकाश मोरे, उद्योजक गजानन होगाडे, श्रीकांत टेके, पांडुरंग धोंडपूडे, दिनकर आनुसे, सुरेश आमाशे आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







