ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा ४७०० कोटींचा व्यवसाय,१६.५६ ,कोटींचा नफा- चेअरमन स्वप्निल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा ४७०० कोटींचा व्यवसाय,१६.५६ ,कोटींचा नफा- चेअरमन स्वप्निल आवाडे

इचलकरंजी:
 कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या वेळी चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी उपस्थित सभासद, मान्यवर आणि हितचिंतकांचे स्वागत करत, बँकेच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला.
या आर्थिक वर्षात बँकेच्या व्यवसायात भरीव वाढ झाली असून, एकूण व्यवसाय रु. ४३०० कोटीवरून रु. ४७०० कोटीपर्यंत पोहोचला. रु. १६.५६ कोटी निव्वळ नफ्याची नोंद झाली असून, एनपीएचे प्रमाण ०% राखण्यात बँकेला यश आले आहे, ही अत्यंत उल्लेखनीय बाब असल्याचे चेअरमन आवाडे यांनी सांगितले.
Advt
हुपरी येथील जवाहर सहकारी बँकेचे यशस्वी विलीनीकरण हा या वर्षातील महत्त्वाचा टप्पा ठरला. १० मार्च २०२५ पासून या बँकेच्या सर्व शाखा जनता बँकेमध्ये सामील झाल्या असून, त्या शाखा कार्यक्षमतेने सुरू आहेत. तसेच कर्नाटक राज्यात अथणी व हारुणेरी येथे दोन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या. पुढील टप्प्यात गुजरात राज्यात शाखा विस्ताराचा मानस असून, त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
ठेवीत रु. ३०९ कोटींची वाढ आणि कर्ज वाटपात रु. १६० कोटींची वाढ झाली आहे. बँकेने लहान व रिटेल कर्ज वितरणाला प्राधान्य दिले असून, स्वयंप्रकाश सोलर कर्ज योजना व सरकारी अनुदानित योजना जसे की PMEGP, आण्णासाहेब पाटील महामंडळ, महिला बचत गट, भाजीपाला व फळ विक्रेते, विविध समाजांसाठी विशेष योजना, अशा अनेक कर्ज योजनांचा प्रभावी अंमलबजावणी केली आहे. यामध्ये १९२४ लाख रुपये इतके अनुदान ग्राहकांना मिळवून देण्यात आले आहे.
बँकेला परकीय चलन व्यवहारासाठी AD-2 परवाना मिळाल्याने आता ग्राहकांना परदेशी व्यवहार, शिक्षण व उद्योगसंबंधी व्यवहार करण्यास अधिक सुविधा मिळत आहेत. तांत्रिक प्रगतीच्या बाबतीत बँकेने यूपीआय, भीम अॅप, क्यूआर कोड, मोबाईल बँकिंग अशा अत्याधुनिक सेवा सुरू केल्या असून, मासिक ८०० कोटी रुपयांहून अधिक डिजिटल व्यवहार नोंदवले जात आहेत.
बँकेच्या आर्थिक आरोग्यास बळकटी देण्यासाठी वसुलीवर भर दिला गेला असून, प्रोव्हिजन कव्हरेज रेशो १००.३३% इतका असून, चालू वर्षी १०% लाभांश जाहीर करण्यात आला आहे.
संजय शिरगावे यांनी विषयपत्रिका वाचन केली सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी बोलताना चांगल्या कामगिरीबाबत सर्व कर्मचारी व संचालक मंडळाचे आभार मानले.सहकार क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा तसेच परदेशी कंपन्यांशी करार करून कमी व्याजदरात कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यास सुचवले.
 चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी व्यासपीठावर उपस्थित संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा),प्रकाश आवाडे (आण्णा), आमदार राहुल आवाडे यांचे विशेष आभार मानून, सर्व संचालक, कर्मचारी, सेवक, ग्राहक व हितचिंतकांचे मन:पूर्वक आभार मानले. सर्वांचे प्रेम आणि सहकार्य कायम राहो, अशी सदिच्छा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
आ.राहुल आवाडे व सहकार महर्षि कल्लाप्पाणा आवाडे दादा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला,तर चेअरमन स्वप्निल आवाडे यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर सर्व संचालक,बोर्ड कमिटी सदस्य,सहकार भारती प्रदेशाध्यक्ष वैशाली आवाडे,प्रकाश दत्तवाडे,अशोकराव सौदत्तीकर,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मला जमले नाही ते स्वप्निल ने केले.-प्रकाश आवाडे

बँकेचा एनपीए शून्य करण्याचे काम मला जमले नाही मात्र ते स्वप्निल ने करून दाखवले तर राहुल राजकारणात माझ्यापेक्षा चांगले व धडाकेबाज काम करत असल्याने माझी दोन्ही मुले किती भारी आहेत,तसेच या दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पाडत होतो त्यामुळे आवाडे दादा किती भारी आहेत असे सांगत त्यांनी कौतुक केले.

६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन स्वप्निल आवाडे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा