मराठी साहित्याचे अन्य भाषेत अनुवादासाठी प्रयत्नांची गरज – प्रा. सप्रे
इचलकरंजी (ता.३०) जागतिक पातळीवर मराठी १२ क्रमांकावर आहे. त्याचा स्वाभिमान सर्वांनीच जपला पाहिजे. पण दाक्षिणात्य भाषांतील साहित्यांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. त्यामुळे त्या भाषेतील साहित्यिक देशपातळीवर पोहचले. पण मराठी भाषेतील साहित्याचे अन्य भाषात अपेक्षीत अनुवाद होताना दिसत नाहीत. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपाद महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचे सदस्य प्रा. अविनाश सप्रे यांनी केले.
येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या यांच्या संयुक्त विदयमाने उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्काराचे वितरण ग्रंथालयाच्या बजाज सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अविनाश सप्रे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे होते. व्यासपीठावर डॉ. अशोकराव सौदत्तींकर, उदयोजक निलेश कुलकर्णी उपस्थित होते.
Advt
यावेळी प्रा. अविनाश सप्रे यांच्या हस्ते विविध साहित्यकृती पुरस्काराने साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सुनीता झाडे (नागपूर), डॉ. सविता नायक-मोहिते (कराड), संकेत म्हात्रे (ठाणे), पद्मरेखा धनकर (चंद्रपूर), चंद्रकांत कुलकर्णी (मुंबई), डॉ. देवानंद सोनटक्के (सातारा), संजीवनी बोकील (पुणे), डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके (पुणे), संतोष आळंजकर (छ. संभाजीनगर), रश्मी गुजराथी (पुणे), प्रशांत आंबी (कोल्हापूर), चित्कला कुलकर्णी (इचलकरंजी) व किरण नाईक (कसनाळ) यांना प्रदान करण्यात आला.
प्रा. अविनाश सप्रे म्हणाले की, मराठी भाषा नासविण्याचे काम, भाषेला अत्यंत गलिच्छ पातळीवर घेवून जाण्याचे काम आजचे राजकारणी करीत आहेत. सर्वच स्तरातील राजकारणी मंडळींच्या भाषेत ओघळपणा येत आहे. त्यांनी नासवलेली मराठी भाषा शुध्द ठेवण्याचे आव्हान आजच्या सर्वच लेखकांसमोर आहे.
स्वागत डॉ. एस. पी. मर्दा यांनी तर सुषमा दातार यांनी प्रास्ताविक केले. अॅड. स्वानंद कुलकर्णी यांनी परिचय करुन दिला. पुरस्कार प्राप्त साहित्यिक सविता नायक-मोहिते व सुनीता झाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिनाक्षी तंगडी व प्रा. डॉ. सुजीत सौंदत्तीकर यांनी केले.
यावेळी पदाधिकारी, संचालक, मान्यवर व्यक्ती, पुरस्कार विजेते व त्यांची कुटुंबिय, रसित श्रोते व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







