महापालिका वर्धापन दिनानिमित्त बासरी-सारंगी जुगलबंदी आणि सायली होगाडे यांच्या नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध
पंडित विवेक सोनार, उस्ताद साबीर खान यांच्या स्वरांची जादू; पदन्यास नृत्य कला अकादमीच्या सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या बासरी-सारंगी जुगलबंदी आणि नृत्याविष्काराने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रारंभी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.
सुप्रसिद्ध बासरीवादक पं. विवेक सोनार आणि सारंगीवादक उ. साबीर खान, तसेच तबलावादक उ. समीर सूर्यवंशी यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारीत सादरीकरण सादर करत रसिकांना सुरांच्या लहरींवर झुलवले. ‘रघुपती राघव राजाराम’ या भक्तिगीताने या सादरीकरणाचा प्रभावी समारोप झाला.
Advt
यानंतर झालेल्या नृत्य सादरीकरणात सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदन्यास नृत्य कला अकादमीच्या ३० युवती व महिला नृत्यांगनांनी बॉलीवूड थीमवर आधारित हिंदी, मराठी व इतर भाषांतील गाण्यांवर शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली. विशेषतः “आधा है चंद्रमा, रात आधी” या गीतावर सायली होगाडे यांचे नृत्य विशेष दाद मिळवून गेले.
कार्यक्रमास उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, महिला व बालकल्याण अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधीक्षक सुजाता दाभोळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण जून महिन्यात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
फोटो-
बासरी व सारंगी सादरीकरण करताना पंडित विवेक सोनार व उस्ताद साबीर खान
पदन्यास कला अकादमी तर्फे नृत्य सादरीकरण करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








