ICHMH51NEWS.IN
9921600800

कल्लाप्पाण्णा आवाडे दादांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कल्लाप्पाण्णा आवाडे दादांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी-
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, इयत्ता १० वी आणि १२ वी परिक्षेमध्ये ७५ टक्केपेक्षा जादा गुण मिळविलेल्या कर्मचार्‍यांच्या मुला-मुलींना कारखाना व कामगार संघटनेच्यावतीने शिष्यवृत्ती वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक सचिन खराडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी कामगार कल्याण अधिकारी सचिन खराडे यांनी, सहकार महर्षि आवाडेदादांनी भविष्याची गरज ओळखून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. भागातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत जवाहरच्या कर्मचार्‍यांना व त्यांच्या पाल्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यात कारखाना आघाडीवर आहे. त्यातून अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत होत आहेच, पण कारखाना व कामगार संघटनासुध्दा शिक्षणासाठी हातभार लावत आहे. कामगारांच्या मुलांनी पुढील इंजिनियरींग, मेडीकल व परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृती तसेच महाराष्ट्र कामगार मंडळाकडून राबविण्यात येणार्‍या इतर सर्व योजना व उपक्रमांचा लाभ जवाहर कामगार संघटनेच्या प्रयत्नातून मिळवून देण्यात आल्याचे सांगितले.
संचालक तथा  माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अध्यक्षीय भाषणात जवाहर कारखाना नेहमी कर्मचार्‍यांसाठी ज्या योजना असतील त्या सुरूवातीपासून दादांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आघाडीवर आहे. कारखान्याची जडणघडण व प्रगतीमध्ये कामगारांचा वाटा मोलाचा आहे. त्यासाठी कारखान्याची कामगार संघटना सदैव प्रयत्नशील असते. कारखाना व्यवस्थापनाचे व संघटनेचे संबंध सौहार्दपूर्ण असल्याने कारखान्याने आतापर्यंतचे ३२ गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडलेले असल्याचे सांगितले.
यावेळी कारखाना आणि कामगार संघटना यांच्यावतीने कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांना ९४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रकाश आवाडे यांची महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नाच्या उच्चस्तरीय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, आमदार राहुल आवाडे तसेच दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेकडून जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ३३ व्या हंगामाकरीता कारखान्यातील मिल रोलरचे पूजन करण्यात आले. तसेच कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण, कामगारांसाठी हाफपीच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच तुलशी ब्लड बँक जयसिंगपूर व लायन्स ब्लड बँक इचलकरंजी यांचे सहकार्याने आवाडेदादांच्या ९४व्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ९४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रास्ताविक जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी केले. आभार सदस्य सुरेश पोवार यांनी मानले. सूत्रसंचालन आण्णासो गिरीबुवा यांनी केले.
 बक्षिस वितरण करताना माजीं मंत्री प्रकाश आवाडे व आ.राहुल आवाडे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा