इचलकरंजी महापालिकेचा ‘गार्बेज रिवॉर्ड’ आधुनिक उपक्रम राबविण्यास सुरुवात
स्वच्छतेत नागरिक, सफाई कर्मचारी आणि उद्योजक यांचा त्रिसूत्री सहभाग
इचलकरंजी –
इचलकरंजी शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने एक अभिनव आणि डिजिटल स्वरूपातील ‘गार्बेज रिवॉर्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत घरगुती कचरा वेळेवर घंटागाडीला देणाऱ्या नागरिकांना आणि दररोज नियमित स्कॅनिंगसह कचरा संकलन करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातील.
हे पॉइंट्स स्थानिक दुकाने, मॉल्स, आउटलेट्स येथे खरेदी करताना सवलतींसाठी वापरता येणार आहेत. या उपक्रमामागे नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेतील सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश असून, शहर अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा मानस आहे.
Advt
या योजनेची अंमलबजावणी ICT (माहिती व संवाद तंत्रज्ञान) प्रणालीच्या सहाय्याने करण्यात येत असून, नागरिकांसाठी एक वापरायला सोपे मोबाईल अॅप उपलब्ध करण्यात आले आहे. अॅपवर ऑफर निवडून, क्लेम करून मिळालेला कुपन कोड संबंधित दुकानात दाखवून सवलत मिळवता येते.
महानगरपालिकेने या उपक्रमात स्थानिक उद्योगधंद्यांना मोफत सहभागी होण्याची संधी दिली आहे. यात कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता व्यवसाय वाढविणे, नवीन ग्राहक मिळविणे, मोफत प्रसिद्धी, तसेच ‘ग्रीन बिझनेस’ म्हणून ओळख निर्माण होणे यांसारखे फायदे मिळणार आहेत.
स्वच्छता ठेवून रिवॉर्ड पॉइंट्स मिळविणे, स्थानिक खरेदीमध्ये सवलती, ‘व्होकल फॉर लोकल’ ला पाठिंबा, आणि पर्यावरण रक्षणात हातभार लावण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे –
🌐 https://ichalkaranjimnp.in
असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका यांनी कळवले आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







