प्रस्थापित होण्यासाठी कवींनी आपली बलस्थाने आणि मर्यादा ओळखावी – नीलाम्बरी कुलकर्णी,सुजित सौंदत्तीकर यांच्या असरगंध काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
इचलकरंजी
” साहित्य क्षेत्रात प्रस्थापित होण्यासाठी कवींनी आपली बलस्थाने अधिक बलवान करून तसेच मर्यादा ओळखून त्या मर्यादांवर मात करत सातत्याने नवनवीन लिखाण केले पाहिजे ” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक निलाम्बरी कुलकर्णी यांनी येथे केले.
प्रा. डॉ. सुजीत सौंदत्तीकर लिखित “असरगंध” या मराठी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा इचलकरंजी येथील पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ येथे पार पडला. त्यावेळी मा. कुलकर्णी यांनी कवींकडून असलेल्या अपेक्षा येथे मांडल्या. त्यांनी ‘असरगंध’ या संग्रहात व्यक्त झालेल्या भावना, संवेदना आणि वास्तवतेचे कौतुक करत लेखकाच्या कवित्वाचे विशेष अभिनंदन केले.
डि.के.टी.ई. इचलकरंजी येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. सौंदत्तीकर यांच्या पन्नासहून अधिक कविता समाविष्ट असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे. ‘असरगंध’ या संग्रहात विविध सामाजिक, भावनिक आणि जीवनानुभवांवर आधारित कविता समाविष्ट असून, त्या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत. नात्यांचे अनेक कंगोरे आणि सत्यघटनांवर आधारित कविता या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.
मा. नीलाम्बरी कुलकर्णी म्हणाल्या, “चंचल असणाऱ्या मनाशी कवींनी सतत सजग राहून संवाद साधला पाहिजे. रोज लिहिलेच पाहिजे असे नाही पण जे लिहिताय ते चांगले असेल याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्याचे रंग जसा वेगळा असतो तसेच त्यातील भावही वेगळे असतात. वाचकांना पटकन आपलेसे करणाऱ्या असरगंधमधील रचना वाचताना त्यांना कवीच्या डोळ्यांमधील वत्सल भाव जाणवला असे त्यांनी नमूद केले.
मराठी साहित्यातील दोन मानसशास्त्रज्ञ म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि बहिणाबाई यांचा उल्लेख केला.
कवी डॉ. सौंदत्तीकर यांनी आपल्या मनोगतात असरगंध नाव कसे सुचले तसेच पुस्तकाचा प्रवास आणि त्यामागची प्रेरणा यावर भाष्य केले. प्रकाशनानंतर असरगंध कवितासंग्रहातील निवडक कवितांचे वाचन चित्कला कुलकर्णी, मनीष आपटे, डॉ. सुजीत सौंदत्तीकर, आराध्या सौंदत्तीकर, ज्योती जोशी, सुषमा दातार, हेमा देशपांडे, माधवी गोडसे, संध्या ढवळे, अश्विनी शिरूर यांनी प्रभावीपणे सादरीकरण केले.
Advt
या सोहळ्यास डॉ. अशोक सौंदत्तीकर, सौ. भाग्यश्री कासोटे – पाटील, सौ. किशोरी आवाडे, सौ. सपना आवाडे, ॲड . स्वानंद कुलकर्णी तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
इचलकरंजी मायबोली कट्ट्याच्या सहयोगाने आयोजित या प्रकाशन सोहळ्यात श्रीनिवास गोडसे यांनी स्वागत प्रास्ताविक तर स्मिता कुलकर्णी यांनी कवीविषयी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांची ओळख चित्कला कुलकर्णींनी करून दिली तर रवींद्र सौंदत्तीकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती कुलकर्णी यांनी केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







