इचलकरंजीत ‘आदि अनादी अनंत सनातन’ व्याख्यानाचे आयोजन
इचलकरंजी :
शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने ‘आदि अनादी अनंत सनातन’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात हे व्याख्यान होणार असून सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौतम खट्टर (देहरादून, उत्तराखंड) मार्गदर्शन करणार आहेत.
या व्याख्यानाच्या निमित्ताने डॉ. खट्टर यांचा दोन दिवसीय इचलकरंजी दौरा निश्चित झाला असून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष राजतिलक लाहोटी, सल्लागार अरविंद कुलकर्णी आणि सनतकुमार दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवराणा युथ फोर्सतर्फे दरवर्षी राष्ट्रभक्तीपर व्याख्यान, भागवत सप्ताह तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. गोशाळा चालविणे, भारतीय संस्कृतीचे संवर्धन या कार्यात संस्थेचा सातत्याने सहभाग असतो. त्याच परंपरेत यंदाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. गौतम खट्टर हे गेल्या अनेक वर्षांपासून सनातन संस्कृतीचा अभ्यास, प्रचार-प्रसार व जनजागृतीचे कार्य करत आहेत. देशभरातील विविध राज्यांत व्याख्यानांद्वारे त्यांनी तरुणांसमोर सनातन धर्माची गुढता, वैज्ञानिक दृष्टिकोन व जीवनपद्धती उलगडली आहे. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे युवकांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान व नवचैतन्य जागृत होत आहे.
Advt
या व्याख्यानातून सनातन परंपरेचा उगम, तत्त्वज्ञान, आचारधर्म तसेच आधुनिक विज्ञानाशी असलेले नाते याविषयी सखोल विवेचन होणार आहे. विशेषतः तरुणांनी आपल्या संस्कृतीचे योग्य आकलन करून अंगीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असा ठाम विश्वास डॉ. खट्टर व्यक्त करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत सौरभ काबरा, सागर लखोटिया, राहुल बाहेती आदी सदस्य उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद कुलकर्णी, शेजारी सनत दायमा,सौरभ काबरा,सागर लखोटिया, राहुल बाहेती
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







