जवाहर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या अभिनयाला प्रोत्साहन; ‘रप्पाटा २’ चित्रपटाचा विशेष शो
इचलकरंजी :
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, हुपरी येथील कर्मचारी श्री. महादेव भिमराव कोरवी यांचे चिरंजीव विकास कोरवी यांची प्रमुख अभिनेता भूमिका असलेला तसेच कारखान्यातीलच कर्मचारी श्री. सुनिल महादेव केसरकर यांचे चिरंजीव विवेक केसरकर यांची सहकलाकार भूमिका असलेला सामाजिक आशयाचा मराठी चित्रपट ‘रप्पाटा २’ दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे.
सामाजिक प्रबोधनाबरोबरच मनोरंजनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या चित्रपटातील सर्व कलाकार हे इचलकरंजी व परिसरातील असून स्थानिक कलाकारांना मोठ्या पडद्यावर संधी मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटातील प्रमुख कलाकार हे साखर कारखान्यातील कामगारांचे सुपुत्र असून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी जवाहर साखर कारखान्याच्या वतीने एक सकारात्मक उपक्रम राबविण्यात आला आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. मनोहर जोशी साहेब यांच्या संकल्पनेतून कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी ‘रप्पाटा २’ हा चित्रपट आवर्जून पाहावा, यासाठी संपूर्ण एक शो बुक करण्यात आला. या उपक्रमातून कामगारांच्या कुटुंबातील युवा कलाकारांना प्रोत्साहन देत समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या उपक्रमास आमदार डॉ. श्री. राहुल आवाडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले असून जवाहर साखर कामगार संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. स्थानिक कलाकार, कामगार कुटुंबे आणि सामाजिक आशय यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







