पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर इचलकरंजीत प्रोसेस उद्योग ३० एप्रिलपर्यत बंद; संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय
इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रोसेस उद्योग ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रोसेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप मोघे यांनी जाहीर केला. इचलकरंजी महापालिकेत ‘आंदोलन अंकुश’ आणि प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काळा ओढ्यातून पंचगंगेत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवावे, या मागणीसाठी शिरोळ येथील आंदोलन अंकुशने आंदोलन छेडले आहे. सांडपाणी रोखले नाही तर १ मे रोजी मजरेवाडी येथील पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराही संघटनेने दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत काळा ओढ्यावर तातडीने बांध घालणे, तसेच सर्वसमावेशक समिती स्थापन करून प्रत्यक्ष पाहणी व अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, विश्वास बालिघाटे व कॉ. आप्पा पाटील यांनी कोरोना काळात उद्योग बंद असताना पंचगंगेचे प्रदूषण थांबले होते, याकडे लक्ष वेधत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावर सायझिंग असोसिएशनचे प्रकाश गौड यांनी सायझिंगमधून सांडपाणी अत्यल्प प्रमाणात असल्याचे सांगितले. सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी शहरातील ५० एमएलडी पाणीपुरवठ्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी ४० एमएलडीवर प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, प्रोसेस असोसिएशनचे संदीप मोघे यांनी सीईटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून काळा ओढ्यात पाणी जात नसल्याचा दावा केला. मात्र आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत “मग ओढ्यात येणारे सांडपाणी नेमके कोणते?” असा सवाल उपस्थित केला.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिका, आंदोलन अंकुश, लोकप्रतिनिधी व उद्योग प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करून संशयित ठिकाणी पाहणी व तपासणी तातडीने करण्याचे निर्देश दिले. महापौर उदय धातुंडे यांनी नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
बैठकीत सीईटीपीमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. ३० एप्रिलपर्यंत आवश्यक उपाययोजना पूर्ण न झाल्यास पुढेही उद्योग बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीस उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे तसेच नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेत झालेल्या बैठकीतील प्रसंग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






