ICHMH51NEWS.IN
9921600800

५ सप्टेंबरपर्यंत गणेश आगमनाचे सर्व मार्ग खड्डेमुक्त; फांद्यांची छाटणी व ड्रेनेजसाठी उकरलेले रस्तेही दुरुस्त होणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

५ सप्टेंबरपर्यंत गणेश आगमनाचे सर्व मार्ग खड्डेमुक्त; फांद्यांची छाटणी व ड्रेनेजसाठी उकरलेले रस्तेही दुरुस्त होणार

इचलकरंजी, प्रतिनिधी : गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच इचलकरंजी महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आगमन मार्ग सुरक्षित व अडथळेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गणेशमूर्तींच्या आगमनावेळी भाविक आणि गणेश मंडळांच्या मिरवणुकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत सर्व प्रमुख आगमन मार्ग खड्डेमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील विविध भागांत ड्रेनेजच्या कामासाठी उकरण्यात आलेले रस्ते गणेश आगमनापूर्वी पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित मक्तेदारांना देण्यात आले असून, ४ सप्टेंबरपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापौर उदय धातुंडे यांनी दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर पॅचवर्क व खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

याशिवाय, गणेशमूर्तींच्या आगमन मार्गावर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांमुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गावरील झाडांच्या वाढलेल्या व धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याचे आदेश सर्व प्रभाग समिती अध्यक्षांना देण्यात आले आहेत. संबंधित प्रभागातील आगमन मार्गांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी फांद्यांची छाटणी, अडथळे दूर करणे आणि मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभाग समिती अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली पार पाडली जाणार आहे.

गणेशोत्सव हा इचलकरंजीकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा प्रमुख सण असून, बाप्पांच्या आगमनावेळी रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेजच्या कामांमुळे निर्माण झालेले अडथळे किंवा झाडांच्या फांद्यांमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन विशेष खबरदारी घेत असल्याचे महापौर धातुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी नव्या कंपनीला येत्या १५ दिवसांत वर्क ऑर्डर देण्यात येणार असून, पुढील दीड महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होऊन शहराची स्वच्छता अधिक प्रभावीपणे केली जाईल, अशी माहिती महापौर उदय धातुंडे व स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी दिली.

नवीन मक्तेदाराकडून दर्जेदार काम करून घेण्याबरोबरच प्रशासनाचीही जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे गटनेते विठ्ठल चोपडे यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, सभापती रूबेन आवळे व सुशांत कलागते उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा