ICHMH51NEWS.IN
9921600800

‘नदी वाचली तरच मानवी संस्कृती आणि आपण सर्व वाचू!’ – डॉ. विश्वास येवले, पुणे 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नदी वाचली तरच मानवी संस्कृती आणि आपण सर्व वाचू!’ – डॉ. विश्वास येवले, पुणे 

इचलकरंजी दि.१७ मे –
“निरंतर वाहणारी निर्मळ जलधारा म्हणजे नदी. यामधील पाणी म्हणजे जीवन आहे, पण हा वारसा आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो की नाही अशी परिस्थिती आहे. नद्या या केवळ पाण्याचे स्त्रोत नसून आपल्या संस्कृतीच्या जीवनवाहिन्या आहेत. आज मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांना प्रदूषणाच्या खाईत लोटले आहे. जर आपण वेळीच जागे झालो नाही, तर भविष्यात पाण्याचे प्रचंड संकट उभे राहील. म्हणूनच नदी वाचली तरच मानवी संस्कृती आणि आपण सर्व वाचू” असे प्रतिपादन पुण्याचे प्रसिद्ध लेखक, जल व पर्यावरण अभ्यासक, योगतज्ज्ञ तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विश्वास येवले यांनी केले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत’ ते बोलत होते. ‘जल योग’ या विषयावर त्यांनी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करीत त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांच्या आणि प्रमुख पाहुणे रुद्राक्ष स्वामी यांच्या हस्ते छ. शिवराय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शामसुंदर मर्दा, समीर गोवंडे आणि घनश्याम सावलानी उपस्थित होते. यावेळी सावलानी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर उपक्रम समन्वयक संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. वक्त्यांचा परिचय सौ. चित्कला कुलकर्णी यांनी करून दिला.
प्रदूषण मुक्तीसाठी जीवन शैलीत बदल करण्याची गरज स्पष्ट करताना डॉ. येवले पुढे म्हणाले की, “नदी प्रदूषण रोखणे ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात रसायनांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. कारण कपडे धुण्याचे साबण, शॅम्पू, इत्यादी घरगुती वापराच्या आणि औद्योगिक रसायनांमुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. याचा विपरीत परिणाम आपल्या सर्वांच्या आरोग्यावर होतो आहे. त्याचबरोबर निसर्गाला न पचणारा प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनही नदी प्रदूषण मुक्तीसाठी कार्यरत असलेल्या डॉ. येवले यांनी आरोग्याचा आणि पर्यावरणाचा संबंध जोडला. “जसा शरीराचा समतोल राखण्यासाठी ‘योग’ आवश्यक आहे, तसाच पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी ‘जल योग’ म्हणजेच जलरक्षण गरजेचे आहे. प्रदूषित पाणी हे अनेक गंभीर आजारांचे मूळ आहे. त्यामुळे नदीचे रक्षण आणि पर्यावरणाचे रक्षण आपण स्वतःपासूनच सुरू केले पाहिजे” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सौ. चित्कला कुलकर्णी यांनी डॉ. येवले यांच्या साहित्यावर आधारित प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेतली.  येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये सुरू असलेल्या व्याख्यानमालेच्या या सत्राला शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. येवले यांनी उत्तरे दिली.  आभार प्रदर्शन संतोष आबाळे यांनी केले.

व्याख्यानमालेत पाचव्या दिवशी जल योग या विषयावर बोलताना डॉ. विश्वास येवले, पुणे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा