“२० कोटींचा घनकचरा कर वसूल; तरी शहर कचर्यातच” – शशिकांत कालेकर
इचलकरंजी:
घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधी रुपये वसूल करूनही शहरात समाधानकारक सेवा दिली जात नसल्याचा आरोप करत सम्राट अशोकनगर येथील नागरिक शशिकांत कालेकर यांनी इचलकरंजी महानगरपालिकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी महानगरपालिकेकडून घरफाळा बिलामधून “घनकचरा व्यवस्थापन सेवा कर” या नावाखाली गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी ३६० रुपये आकारले जात आहेत. शहरात सुमारे ५७ हजार ५४० मिळकतदार असून या माध्यमातून मनपाकडे दरवर्षी सुमारे २० कोटी रुपये जमा होतात. मात्र, त्याच्या तुलनेत नागरिकांना दर्जेदार सेवा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरातील अनेक भागांत कचर्याचे ढीग साचलेले दिसतात, घंटागाडी वेळेवर येत नाही, तसेच कचरा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांना मानसिक त्रासासह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिलावर्ग सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडत असल्याने वेळेवर कचरा संकलन न झाल्यास मोठी गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून वेळेत कचरा उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, १५ मार्च २०२६ रोजी इचलकरंजीतील नगरसेवक व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा घनकचरा व्यवस्थापन अभ्यासासाठी इंदौर दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इंदौरमधील तज्ज्ञांना इचलकरंजीत बोलावून मार्गदर्शन घेतले असते, तर खर्चात बचत होऊन नगरसेवक, सामाजिक संस्था, महिला गट आणि मनपा कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फायदा झाला असता, असे निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याची चर्चा असताना सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा, मनपाच्या गाड्यांचा अनावश्यक वापर थांबवावा आणि भविष्यात नियोजनबद्ध कारभार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





