ICHMH51NEWS.IN
9921600800

कथाकथनातून श्रोत्यांना भावनिक व हास्यरसाची मेजवानी    – रेखा मुंदडा यांचे सादरीकरण 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कथाकथनातून श्रोत्यांना भावनिक व हास्यरसाची मेजवानी

   – रेखा मुंदडा यांचे सादरीकरण 

इचलकरंजी दि.१६ मे-
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आयोजित ४८व्या ‘मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेअंतर्गत धुळे येथील प्रसिद्ध कथाकथनकार सौ. रेखा मुंदडा यांनी आपल्या श्रवणीय शैलीतून रसिकांना भावनिक, वैचारिक तसेच हास्यरसाची सुंदर मेजवानी दिली. त्यांच्या सादरीकरणाला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. मुंदडा आणि प्रमुख पाहुणे दीपक निंगुडकेकर तसेच पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवांडे, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशनचे विश्वस्त शामसुंदर मर्दा आणि रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी प्रा. अमर कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी स्वागतपर मनोगत प्रा. कांबळे यांनी व्यक्त केले.
सौ. मुंदडा यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला, सकारात्मक आशयाची एक हिंदी कविता सादर केली. ‘माझं नाव आग लावणा-यांच्या यादीत नको तर आग विझवणा-यांच्या यादीत असावे’ असे म्हणणारी चिमणी या कवितेत होती. समाज व्यवहारात आज दांभिकपणा वाढत चालला आहे याबद्दलची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कथकथनाच्या सुरुवातीला त्यांनी व. पु. काळे यांची ‘आकाश’ ही पहिली भावस्पर्शी कथा सादर केली. ग्रामीण भागातून लग्न होऊन मोठ्या शहरात, मोठ्या उद्योजक घराण्यात आलेल्या एका भोळ्याभाबड्या, अल्लड युवतीची ही कथा होती. पतिच्या अकाली निधनानंतर समाजात तिने परिपक्वपणे, कणखरपणे उभे राहावे यासाठी तिच्या सासूने मुद्दाम घडवलेल्या नाटकाची ही संवेदनशील अशी दीर्घकथा होती.
उत्तरार्धात मुंदडा यांनी दोन छोट्या कथा सादर केल्या. रणजित देसाई लिखित ‘ताजमहल’ या गंभीर व अंतर्मुख करणा-या कथेमध्ये ताजमहाल बांधणा-या कारागीराची कथा आणि व्यथा त्यांनी प्रभावीपणे मांडली. शेवटची वपु काळे लिखित ‘रानडे आणि कानडे’ ही, एकाच युक्तीने सुंदर युवतीशी संवाद साधू पाहणाऱ्या दोन भावांची हलकीफुलकी, हास्यरसपूर्ण कथा सांगितली.
सौ. रेखा मुंदडा यांचे स्पष्ट उच्चार, आवाजातील नाट्याभिनय, अंतःकरणाला भिडणारी ओघवती निवेदन शैली या सर्व वैशिष्ट्यांमुळे त्यांनी रसिक श्रोत्यांना दीड तास खिळवून ठेवले आणि त्यांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पद्माकर खोत यांनी केले तर वक्त्यांचा परिचय सौ. शर्वरी गोवांडे यांनी करून दिला. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा