ICHMH51NEWS.IN
9921600800

शेतीचा इतिहास म्हणजे आपल्या संस्कृतीचा इतिहास होय- प्रा. इंद्रजित भालेराव 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शेतीचा इतिहास म्हणजे आपल्या संस्कृतीचा इतिहास होय– प्रा. इंद्रजित भालेराव 

इचलकरंजी
“मानवी उत्क्रांतीच्या लाखो वर्षांच्या इतिहासात साधारणपणे गेल्या दहा हजार वर्षात पाच हजार वर्षे पशू पालनाचा इतिहास आहे तर त्यानंतर पाच हजार वर्षे शेतीचा इतिहास आहे. माणसाने शिकार करून म्हणजे मारून खायच्या ऐवजी पेरून खायला सुरुवात केली तो शेतीचा इतिहास म्हणजेच एक प्रकारे आपल्या संस्कृतीचा इतिहास आहे. कारण त्यानंतर हळूहळू माणसाची सुसंस्कृत वाटचाल सुरू झाली.” अशा आशयाचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, प्रा. इंद्रजीत भालेराव, परभणी यानी केले. ‘शोध शेती संस्कृतीचा’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण तसेच रंजक असे व्याख्यान दिले.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४८व्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत सातव्या दिवशी भालेराव हे ‘शोध शेती संस्कृतीचा’ या विषयावर बोलत होते. सुरुवातीला त्यांच्या हस्ते छ. शिवराय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनोरंजन मंडळाचे कार्यवाह दत्ता टोणपे यांनी भेट वस्तू प्रदान करून पाहुण्यांचे स्वागत केले. अध्यक्ष समीर गोवंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर उपक्रम समन्वयक संजय होगाडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
“कशी उन्हात, उन्हात तळतात माणसं
कशी मातीत, मातीत मळतात माणसं
कशी खातात जिवाला खस्ता…”
अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित संवेदनशील कविता लिहिणारे कवी भालेराव यांनी एकूणच शेतीच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला आहे. “शेती ही केवळ मानवाच्या उपजीविकेचे साधन नसून ती ५००० वर्षांची समृद्ध संस्कृती आहे. मानवी जीवनाचा आणि संस्कृतीचा विकास शेतीच्या शोधाशी जोडलेला आहे. वैदिक काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत शेतीने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. आपली ही मूळ शेती संस्कृती समजून घेतली तर आपल्याला आपल्या वाटचालीचा शोधही घेता येईल” अशा आशयाचे उद्गार त्यांनी काढले. या मौलिक विषयावर बोलताना भालेराव यांनी ऐतिहासिक दाखले आणि लोककथांचा वेध घेत रसिक श्रोत्यांशी संवाद साधला.
त्यानी आपल्या ओघवत्या आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मानवी जीवनातील वैदिक काळापासून प्राकृत काळापर्यंतचा साधारणपणे अडीच तीन हजार वर्षांचा शेती संदर्भातील संस्कृतीचा प्रवास श्रोत्यांसमोर जिवंत केला. त्यांनी वैदिक काळातील शेतीचे स्वरूप सांगून सुरुवात केली. त्यानंतर महाभारत कालीन शेती व्यवस्था, तसेच प्राचीन काळी पाराशर ऋषी आणि कश्यप ऋषी यांनी शेती विषयावर लिहिलेल्या अमूल्य ग्रंथांचा संदर्भ देऊन त्या काळातील कृषी विज्ञानाची प्रगती स्पष्ट केली. पुढे बोलताना त्यांनी कौटिल्यांच्या अर्थशास्त्रातील शेतीचा विचार, बौद्ध आणि जैन कालखंडातील शेतीचे बदलते स्वरूप, प्राकृत काळातील शेतीची वैशिष्ट्ये सांगितली.
हा सर्व माहितीपूर्ण आढावा घेताना कवी भालेराव यांनी “प्राचीन काळी पुरूष हे जगण्यासाठी शिकार करायचे तर स्त्रियांनी आपल्या निरिक्षणातून शेतीचा शोध लावला. गर्भवती असताना स्त्रिया चार महिने एका ठिकाणी असायच्या, त्या काळात जमिनीत पेरले गेलेले उगवते हे ज्ञान तिला मिळाले असे शेती शास्त्र सांगते. वैदिक काळात उर्वरा आणि सीता असे शेतीचे दोन प्रकार होते तर महाभारत काळात देव मातृक, नदी मातृक आणि प्रकृती मातृक असे तीन प्रकार होते. पुढील काळात शेती संस्कृती बहरत गेली”
अशा प्रकारची माहिती सोप्या भाषेत दिली.
आपल्या व्याख्यानात केवळ कोरडा इतिहास न मांडता प्रा. भालेराव यांनी शेती संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या विविध मनोरंजक लोककथा, पूर्वजांचे अनुभव आणि पुराणकथांचे संदर्भ दिले. यामुळे व्याख्यान रंजक आणि खिळवून ठेवणारे झाले. मातीशी माणसाचे असलेले रक्ताचे नाते त्यांनी आपल्या खास शैलीत अधोरेखित केले. शेवटी आपल्या काही कविता त्यांनी प्रभावीपणे सादर केल्या.
“भर उन्हात जन्मला, माती तोंडात घेऊन
वाढलास एवढा तू, धान मातीच खाऊन
मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं
बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं”
या भावस्पर्शी कवितेने त्यांनी आपल्या व्याख्यानाची सांगता केली. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा