ICHMH51NEWS.IN
9921600800

संरक्षण क्षेत्रात आजचा भारत समर्थ आणि सशक्त – काशीनाथ देवधर, पुणे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संरक्षण क्षेत्रात आजचा भारत समर्थ आणि सशक्त – काशीनाथ देवधर, पुणे

इचलकरंजी दि.१८ मे-
“आज भारताकडे सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे आहेत आणि या क्षेत्रात आपले नवनवीन संशोधन व स्वदेशी उत्पादन सातत्याने सुरू आहे, त्यामुळे संरक्षण क्षेत्रात आज भारत देश समर्थ आणि सशक्त असा आहे. मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम या दूरदृष्टी असलेल्या महान शास्त्रज्ञाने भारताला स्वदेशी शस्त्र निर्मितीकडे नेण्याचा निर्धार केला. त्यातून अग्नी, पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग यासारखी भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली आणि त्या प्रेरणादायी पायावरच भारताने आज हा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे” अशा आशयाचे उद्गार डीआरडीओमधून निवृत्त अधिकारी व ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, पुणे यांनी काढले.

‘स्वदेशी शस्त्र सज्जतेची गरुड झेप’ या विषयावर अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यानातून भारतीय संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाचा प्रवास देवधर यांनी उलगडून दाखवला. जवळपास दोन तास दृकश्राव्य माध्यमातून केलेल्या भाषणात त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आयोजित व्याख्यानमालेत सहाव्या दिवशी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या हस्ते छ. शिवराय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे उमेश कुलकर्णी आणि पदाधिकारी उपस्थित होते. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले तर काशीनाथ जगदाळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

“संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत भारत देश आज स्वावलंबी झाला आहे. २०१४ सालापुर्वी जगाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आयात करणारा आपला भारत देश आज तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक देशांना आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्यात करत आहे. स्वदेशी तंत्रज्ञान आणि भारतीय वैज्ञानिकांच्या जिद्दीमुळेच भारताने संरक्षण क्षेत्रात ही गरुड झेप घेतली आहे” असे प्रतिपादन देवधर यांनी केले. देवधर यांनी आपल्या व्याख्यानात भारताकडे असणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांची आणि अमोघ क्षमता असलेल्या विविध क्षेपणास्त्रांची सविस्तर माहिती दिली. भारत कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आज कसा सज्ज आहे, हे तांत्रिक मुद्दे त्यांनी सोप्या भाषेत मांडून आणि समर्पक स्लाईड्सच्या सहाय्याने श्रोत्यांना समजावून सांगितले. भारतीय बनावटीच्या अत्याधुनिक तोफा, क्षेपणास्त्रे आणि रणगाडा या क्षेत्रातील स्वदेशी प्रगतीचा आलेख त्यांनी श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडला.

डीआरडीओमध्ये कार्यरत असताना डॉ. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव लाभलेल्या देवधर यांनी आपल्या व्याख्यानातून डॉ. कलाम यांची कार्यपद्धती, साधेपणा आणि प्रेरणादायी नेतृत्वाची अनेक उदाहरणे सांगितली. “मोठे ध्येय ठेवा, त्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवा, प्रचंड परिश्रम करा आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवा” हा डॉ. कलाम यांचा संदेश त्यांनी श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडला. जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याचा मारा करणारा तोफगोळा भारताने विकसित केल्याचे सांगताना त्यांनी भारतीय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा अभिमान व्यक्त केला. भारतीय क्षेपणास्त्रे व रणगाडे तसेच ‘आय एन एस विक्रांत’सारखी भारतीय बनावटीची युद्धनौका यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे त्यांनी नमूद केले.

“आज आपली संरक्षण सिद्धता प्रचंड प्रमाणात आहे. आपली भूदल, नौसेना आणि हवाई दल ही तीनही सैन्यदले एकत्रित आणि सज्जतेने कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास समर्थ आहेत. पर्सनल वेपन, सेक्शनल वेपन, लाईट वेट लॉन्चर, आर्टिलरी वेपन, पिनाका, रणगाडे, इत्यादी सर्व बाबतीत आपण खूप आधुनिकीकरण व प्रगती केल्याने आपण संरक्षण क्षेत्रात जगभरात लौकिक प्राप्त केला आहे” असे देवधर म्हणाले. जमीन, आकाश, पाणी आणि अंतराळ या सर्व क्षेत्रांमध्ये भारत आता मोठ्या प्रमाणात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रशियातून आयात होणाऱ्या २६ किलो वजनाच्या शस्त्रास्त्राला भारतीय तंत्रज्ञानातून जवळपास १४ किलोपर्यंत हलके करण्यात देवधर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या शस्त्राची चाचणी, स्वतः सहा वेळा फायरिंग करून घेतल्याचा थरारक अनुभव त्यांनी सांगितला. अनेक वेळा ट्रायलदरम्यान अपघात झाल्याच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. कारगील, उरी, बालाकोट आणि आताचे ऑपरेशन सिंदूर यामध्ये पाकिस्तानला कशा प्रकारे धडा शिकवला आहे, याची प्रभावी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे सभागृहात देशाभिमान जागवणारे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रभक्तीची भावना जागवणाऱ्या या व्याख्यानाला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन संतोष आबाळे यांनी केले. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये सदरचे व्याख्यान संपन्न झाले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा