मजुरीवाढीवरून खर्चीवाल्यांचा संताप; प्रांत कार्यालयात तुफान घोषणाबाजी
बैठक निष्फळ; बुधवारी अंतिम निर्णयाचा इशारा, तोपर्यंत यंत्रमाग बंदच
इचलकरंजी :
तब्बल तेरा वर्षांपासून मजुरीवाढ न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा संताप सोमवारी प्रांत कार्यालयात उसळला. मजुरीवाढीच्या प्रश्नावर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बोलावलेली बैठक तब्बल अडीच तास चालूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने खर्चीवाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बुधवारी दुपारी चार वाजता पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, तोपर्यंत यंत्रमाग बंद आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार यंत्रमागधारकांनी जाहीर केला.
वहिफणीच्या दरात नुकतीच १८ टक्के वाढ झाल्यानंतर खर्चीवाल्यांचा संताप अधिकच तीव्र झाला आहे. गेल्या १२ ते १३ दिवसांपासून शहर व परिसरातील अनेक यंत्रमाग बंद आहेत. वाढते वीजदर, सुटे भाग व कच्चामालाच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे मजुरीवाढ अपरिहार्य असल्याची भूमिका यंत्रमागधारकांनी बैठकीत ठामपणे मांडली.
यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी पुंडलिकराव जाधव, विश्वनाथ मेटे, विनय महाजन, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले, दौलत पाटील, धर्मराज जाधव, दिनकर अनुसे यांनी तेरा वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मांडत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. तर ट्रेडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी, विनोद कांकाणी, ओमप्रकाश दरक, सिताराम बजाज, कमलकिशोर राठी, ओमप्रकाश काबरा, जगदीश छाजेड, चौधरी, घनश्याम इनानी यांनी “सभासदांशी चर्चा करावी लागेल,” असे सांगत आणखी वेळ मागितला.
बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बुधवारी अंतिम बैठक घेऊन निर्णय करावा लागेल, असा स्पष्ट इशारा दिला. दरम्यान, प्रांत कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या यंत्रमागधारकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. महिला यंत्रमागधारकांची उपस्थितीही लक्षणीय होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.बैठकीस अप्पर तहसीलदार महेश खिलारी,सहायक कामगार आयुक्त कार्यालयातुन जानकी भोईटे,राहुल तोडकर,शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते.
प्रांत कार्यालयात बैठकीदरम्यान घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







