खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचे आज अन्नत्याग आंदोलन
इचलकरंजी:
खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत उद्या बुधवारी दुपारी चार वाजता प्रांत कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.. जोपर्यंत मजुरीवाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत यंत्रमागधारकांनी *एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन* करावे असे आवाहन खर्चीवाला यंत्रमागधारक संघटनेच्या वतीने पुंडलिकराव जाधव यांनी केले आहे.
गेली पंधरा दिवस मजुरी वाढीसाठी गावातील यंत्रमाग बंद आहेत. ट्रेडिंग असोसिएशन गेली तेरा वर्ष मजुरीवाढ देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने संपाचे हत्यार उपसले आहे. याची दखल घेत सोमवारी 18 रोजी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दोन्ही घटकांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत योग्य तोडगा निघू शकला नाही. ट्रेडिंग असोसिएशनने एक दिवसाची मुदतवाढ मागितली. त्यानुसार उद्या बुधवारी बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचतीचे आवाहन केले आहे. याचाच भाग म्हणून या मीटिंगसाठी येणाऱ्या सर्व यंत्रमागधारकांनी दिवसभर अन्नत्याग आंदोलन करावें. जोपर्यंत मजुरी वाढीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत कोणीही जेवणाचे डबे आणू नयेत अथवा अन्न सेवन करू नये. जेव्हा मजुरीवाढ मिळेल तेव्हा याच ठिकाणी संध्याकाळी *पिठलं भाकरी* खाऊन आंदोलन सोडण्यात येईल. तसेच जर मजुरीवाढीचा प्रश्न सुटला नाही तर पुढील लढ्याची दिशा जाहीर करण्यात येईल.
बुधवारी खर्चीवाला यंत्रमाग धारक व ट्रेडिंग असोसिएशनची दुसरी बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज यंत्रमाग धारक संघटनांची बैठक पार पडली. यावेळी पुढील आंदोलनाचे नियोजन व मजुरी वाढीबाबत घ्यावयाची भूमिका यावरच सविस्तर चर्चा झाली. यंत्रमागधारक जागृती संघटनेचे विनय महाजन, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएनचे पुंडलिकराव जाधव, शहाजी भोसले, शिवसेना प्रणित यंत्रमागधारक संघटनेचे नंदकुमार लोखंडे, साधा यंत्रमाग बचाव समितीचे विश्वनाथ मेटे, खर्चीवाला यंत्रमागधारक संघटनेचे धर्मराज जाधव उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






