‘अपरिचित पुलं’नी हसवले आणि अंतर्मुखही केले
– पु. ल. देशपांडे यांच्या अनवट साहित्यविश्वाचा अनोखा प्रवास
इचलकरंजी दि.२१ मे-
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले पु. ल. देशपांडे हे विनोदी लेखक म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. पण त्या पलीकडे जाऊन पुलंचे आपणास माहीत नसलेले विविध प्रकारचे दर्जेदार साहित्य आणि या अनवट साहित्याचा वेध घेणारा ‘अपरिचित पुलं’ हा कार्यक्रम येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत संपन्न झाला. या दर्जेदार कार्यक्रमाने रसिकांना हसवले, त्याचबरोबर भावस्पर्शी लेखन आणि प्रभावी सादरीकरणाने अंतर्मुखही केले. गायक व अभिनेते चंद्रकांत काळे, लेखक व दिग्दर्शक डॉ. सतीश आळेकर आणि प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी या दिग्गज कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.
शब्दवेध, पुणे प्रस्तुत ‘अपरिचित पुलं’ या विशेष कार्यक्रमात पु. ल. देशपांडे यांचा पत्रव्यवहार, कविता, गाणी, छोटेखानी ललित लेख, प्रस्तावना, अभिप्राय, इत्यादी वेगळ्या प्रकारच्या लेखन शैलीचा अनोखा प्रवास रसिकांना अनुभवता आला. पुलंनी सुरुवातीच्या काळात म्हणजे ५०च्या दशकात लिहिलेल्या अनवट साहित्याचे अभिवाचन आणि काही गाणी अशा सादरीकरणातून हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार झाला. यावेळी उत्कृष्ट अशी संगीत साथ अपूर्व द्रविड (तबला) आणि दिप्ती कुलकर्णी (हार्मोनियम) यांनी केली.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ४८व्या व्याख्यानमालेत नवव्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला कार्यक्रमाचे पाहुणे, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी आणि सुरेश चौगुले यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. घनश्याम सावलांनी यांनी स्वागत केले तर समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद दांडेकर यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. याप्रसंगी कुलकर्णी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले तसेच त्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कलाकारांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायक व अभिनेते चंद्रकांत काळे यांनी “मी एकदा आळीत गेलो…” या गीताने केली. त्यांच्या प्रभावी गायनाने सुरुवातीलाच सभागृहात रंगत निर्माण झाली. कार्यक्रमात डॉ. आळेकर, गिरीश कुलकर्णी आणि काळे यांनी पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यविश्वातील अनेक अपरिचित पैलू उलगडून दाखवले. ‘गाळीव इतिहास’ या मिश्किल ललित लेखाचे अभिवाचन तिघांनी मिळून केले. त्याचबरोबर पुलंची अनेक मान्यवरांना लिहिलेली काही गंमतीशीर तर काही संवेदनशील अशी वेगवेगळ्या शैलीमधील पत्रेही तिघांनी अतिशय चांगल्या प्रकारे सादर केली.
कार्यक्रमात चंद्रकांत काळे यांनी गाण्यांच्या माध्यमातून पुलंच्या साहित्याचे भावविश्व रसिकांसमोर उभे केले.
“मावळत नाही सूर्य आता
पूर्वी जसा मावळत होता
खवळत नाही दर्या आता
पुर्वी जसा खवळत होता”
अशी पुलंची निवडक गाणी त्यांनी छान सादर केली. ‘गांधीजी आणि सत्ता’ या कवितेत त्यांनी गांधीजींची व्यथा मांडली तर ‘निरोप शांतिनिकेतचा’ या भावस्पर्शी कवितेने सभागृह भारावून गेले.
कार्यक्रमात डॉ. सतीश आळेकर यांनी बेटकुळी, लीळाचरित्र, रामजोशी, दगड, तुलसी व कृष्ण, यांसारखे पुलंचे साहित्य परिणामकारकपणे सादर केले. “मला आस्तिक व्हायचंय पण…” ही पुलंची त्यांनी सादर केलेली कविता उत्तम झाली तसेच नवकवी हरी कुरणे यांच्या गद्य-पद्य मिश्रित पत्राविषयी सांगताना त्यांनी पुलंच्या व्यक्तिमत्त्वातील जिव्हाळा आणि विनोदबुद्धी अधोरेखित केली.
गिरीश कुलकर्णी यांनी पुलंचे बरे आहे, अनामिक रस्ता, इत्यादी ललित साहित्य छान सादर केले. बलुतं या कादंबरीवरील पुलंचे चिंतन सादर करताना, आपल्या समाज व्यवस्थेचे दर्शन त्यांनी घडवले. बंगालीमधून पुलंनी अनुवादीत केलेली
“विझे दिवसाचा दिवा,
सूर्य बुडाला बुडाला.
मेघ आकाशी जमले,
लोभ चंद्राशी जडला”
ही कविता त्यांनी सुंदररित्या सादर केली. पुलंची मान्यवर साहित्यिकांना लिहिलेली पत्रेही त्यांनी प्रभावीपणे सादर केली.
कार्यक्रमादरम्यान पु. ल. देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकण्यासाठी शांतिनिकेतनमध्ये केलेले वास्तव्य, साहित्यावरील त्यांचे प्रेम आणि माणसांकडे पाहण्याची त्यांची निराळी दृष्टी यांचे अनेक संदर्भ उलगडत गेले. संगीत, साहित्य, विनोद आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील तसेच कोल्हापूर येथील रसिकांचा प्रतिसाद मिळाला. शेवटी संतोष आबाळे यांनी आभार व्यक्त केले.
अपरिचित पुलं हा कार्यक्रम सादर करताना सतीश आळेकर, गिरीश कुलकर्णी आणि चंद्रकांत काळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






