ICHMH51NEWS.IN
9921600800

जयसिंगपुरातील खूनप्रकरणी आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जयसिंगपुरातील खूनप्रकरणी आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद

जयसिंगपूर
जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने जयसिंगपूर शहरातील सा. रे. पाटील मैदान येथे घडलेल्या निर्घृण खूनप्रकरणातील आरोपीला अवघ्या चार तासांच्या आत ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
फिर्यादी आसिफ झाकीर काझी (वय ३५, रा. गल्ली नं. १३, मच्छी मार्केटजवळ, जयसिंगपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सा. रे. पाटील मैदान येथे ही घटना घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजु लक्ष्मण कांबळे (वय ३७, रा. व्ही. बॉईज चौक, शाहूनगर, जयसिंगपूर) याने साहिल झाकीर काझी याच्याशी गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून झालेल्या वादाचा तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवरील कमेंटचा राग मनात धरून त्याला आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी यांना मैदानावर बोलावले. त्यानंतर साहिल काझी याच्या छातीवर व डाव्या दंडावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापोलिसप्रमुख निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार तसेच ताहीर मुल्ला, जावेद आंबेकरी, रहमान शेख, शुभम घाटगे आणि महेश घाटगे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने आणि पोलीस नाईक ताहीर मुल्ला यांना बातमीदारामार्फत आरोपी म्हैशाळ (ता. मिरज) येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ म्हैशाळ येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता आरोपीने खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा