आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर
इचलकरंजी :
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्या वतीने दिले जाणारे २०२५ सालचे विविध साहित्यकृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुणे येथील कवयित्री जुई कुलकर्णी यांच्या ‘तुझ्याकडे येण्याच्या कविता’ या काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, तर संतोष नागो शिंदे यांच्या ‘पटयारा’ या पुस्तकाला उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप सन्मानपत्र व १० हजार रुपये रोख असे आहे.
कै. वसंतराव दातार स्मृती लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार जितेंद्र कुवर यांच्या ‘झाडाची कविता’ या काव्यसंग्रहाला, तर कै. सुलभा मगदूम स्मृती पुरस्कार अरविंदा भामरे यांच्या ‘शापित कोलाहलाच्या नोंदी’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. तसेच क्षितिज देसाई यांच्या ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते…’ या कथासंग्रहाला उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, अभय इनामदार यांच्या ‘भूछत्र’ या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे.
स्थानिक साहित्यिक पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बापू तारदाळकर यांना, तर उत्कृष्ट वाचक पुरस्कार सुनिल श्रेष्ठी यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता आपटे वाचन मंदिराच्या बजाज सभागृहात होणार असल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





