शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष; ४९ गुंतवणूकदारांची २.२५ कोटींची फसवणूक
इचलकरंजी:
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून इचलकरंजीतील ४९ गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी २५ लाख ५७ हजार ९७२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी व्यंकटरमण ओमप्रकाश शिरापूरम (रा. सुंगधा पाटील मळा, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहसिन कादर मणेर (रा. आयकॉन पार्क, आमराई रोड, इचलकरंजी) आणि मुदस्सर जमीर मकानदार (रा. इचलकरंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२२ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत सोन्या मारुती मंदिरासमोरील ‘ट्रेडिंग पॉईंट’ कार्यालयातून आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ८ टक्के नफा मिळेल, असे सांगून नागरिकांकडून पैसे गोळा केले. सुरुवातीच्या काही महिन्यांत परतावा देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीसह अन्य ४८ जणांकडून ऑनलाइन व्यवहार, आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे कोट्यवधी रुपयांची रक्कम स्वीकारली.
मात्र गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागले. डिसेंबर २०२५ पासून आरोपी कुटुंबासह बेपत्ता झाले असून त्यांचे कार्यालय बंद आहे तसेच मोबाईल फोनही बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक, गडहिंग्लज विभाग यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणामुळे शहरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




