माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त गंगा आरतीस उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी, दि. ४ :
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व धार्मिक उपक्रमांनी युक्त या सेवा सप्ताहात दुसऱ्या दिवशी पंचगंगा नदी घाटावर झालेल्या भव्य महायज्ञ व गंगा आरती संपन्न झाली.
सेवा सप्ताहांतर्गत प्रभाग क्रमांक ११ मध्ये शशिकांत मोहिते, प्रदीप धुत्रे, इम्रान बागवान, राजू बोंद्रे व सारिका पाटील यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली.
माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या पुढाकाराने शंभूतीर्थ येथे सामूहिक ध्येयमंत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच सायंकाळी शिवतीर्थ येथे उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दीपांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला.
सेवा सप्ताहातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या पंचगंगा नदी घाटावरील महायज्ञ व भव्य गंगा आरतीचे आयोजन ३ जून रोजी साईप्रसाद ग्रुपतर्फे सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राजस्थानहून आलेल्या वेदपाठी पंडितांच्या मंत्रोच्चारात महायज्ञ पार पडला. शहरातील विविध प्रभागांतून संकलित करण्यात आलेल्या धान्याचा यज्ञासाठी उपयोग करण्यात आला. सायंकाळी सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरात दीपमाळा प्रज्वलित करण्यात आल्या. शंखनाद, घंटानाद आणि वैदिक मंत्रोच्चारांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. नऊ स्वतंत्र मंचांवरून एकाच वेळी करण्यात आलेल्या गंगा आरतीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. आरतीदरम्यान अनेकांनी पंचगंगा मातेला अभिवादन करत शहराच्या समृद्धी, औद्योगिक प्रगती, सुख-शांती आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रार्थना केली.त्यानंतर आतिषबाजीने परिसर उजळून निघाला.
यावेळी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आरती साठी महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. नदीपात्रातील लहान पुलावर तसेच घाट परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हजारो नागरिकांनी मोबाईलद्वारे या सोहळ्याचे चित्रीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय महाजन यांनी केले.
वाहतूक कोंडी महापौरांचा पुढाकार
कार्यक्रमानंतर एका ट्रकच्या बिघाडामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महापौरांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






