ICHMH51NEWS.IN
9921600800

खोदकामामुळे रस्त्यांची दुरावस्था; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खोदकामामुळे रस्त्यांची दुरावस्था; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

इचलकरंजी:
शहरात भुयारी गटार योजना, गॅस पाईपलाईन, केबल टाकणे तसेच विविध नागरी सुविधांच्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापौर, उपमहापौर व आयुक्त यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दाभोळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि गल्ली-बोळांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते दिसेनासे होतात. परिणामी दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि पादचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्त्यांवरील खड्डे, उघडी मॅनहोल्स व रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांबाबत संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याचे तसेच नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आदेशाची इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील सर्व खोदकाम केलेल्या रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून संबंधित ठेकेदारांकडून दर्जेदार डांबरीकरण करावे, शाळा, रुग्णालये व प्रमुख चौकांतील खड्डे प्राधान्याने बुजवावेत तसेच धोकादायक ठिकाणी सुरक्षा फलक व बॅरिकेड्स उभारावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा