दिवाळीपूर्वी शहरातील सर्व पथदिवे बदलणार; कामाला गती देण्याचे स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांचे निर्देश
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ४ जून रोजी विद्युत विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक पार पडली. यावेळी स्थायी समितीचे सदस्य, विभागाचे अधिकारी तसेच शहरातील पथदिवे बदलण्याचे काम करणाऱ्या ‘विन्सी ग्लोबल’ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत विद्युत विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील सर्व पथदिवे बदलण्याचे काम ‘विन्सी ग्लोबल’ या कंपनीकडे देण्यात आले असून मागील चार महिन्यांत झालेल्या कामाची माहिती सदस्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींकडून घेतली. उर्वरित सर्व पथदिवे दिवाळीपूर्वी बदलून काम पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या.
यासाठी कामाचे सविस्तर वेळापत्रक आणि बारचार्ट तयार करून तातडीने महानगरपालिकेकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित कंपनीचा ठेका रद्द करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला. त्यावर कंपनीच्या प्रतिनिधींनी दिवाळीपूर्वी सर्व पथदिवे बदलण्याची ग्वाही दिली.
पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार नवीन पथदिवे उपलब्ध करून देण्यात येणार असून ते पुढील एका महिन्यात बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित सुमारे १३ हजार पथदिवे दिवाळीपर्यंत बदलण्यात येणार आहेत.
बैठकीत विद्युत विभागातील मनुष्यबळाची स्थितीही तपासण्यात आली. विभागाकडे सोपविण्यात आलेल्या कामांच्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश स्थायी समिती सभापतींनी दिले. तसेच पथदिवे वेळेत सुरू होण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना करण्यात आल्या.
स्थायी समितीची बैठक सभापती सतीश मुळीक व अति आयुक्त सुषमा शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800



