ICHMH51NEWS.IN
9921600800

शासकीय भूखंडावरील २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमितीकरणासाठी अर्ज वाटप व मार्गदर्शन मेळावा संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शासकीय भूखंडावरील २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमितीकरणासाठी अर्ज वाटप व मार्गदर्शन मेळावा संपन्न

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय भूखंडावरील १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने अर्ज वाटप व विशेष मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. हा मेळावा प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत शिवमूर्ती नगर येथे विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्र. जमीन-२०२६/प्र.क्र.२०/जमीन १, दिनांक २५ मार्च २०२६ अन्वये अतिक्रमणे नियमित करण्याबाबतच्या तरतुदींची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. मेळाव्यात पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया तसेच नियमितीकरणासंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त रामचंद्र कांबळे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करत शासनाच्या निर्णयाचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. पंतप्रधान आवास योजना विभागाच्या शुभांगी जोशी यांनी शासनाने निश्चित केलेल्या नियम व अटींची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे यांनी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले.

यावेळी विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी शिवमूर्ती नाईक नगर परिसरातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे सांगितले.

मेळाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासन निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मालमत्ता नियमितीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमास नगरसेवक सचिन राणे, नितीन कोकणे, राजेंद्र लोखंडे, सहाय्यक आयुक्त नितीन बनगे, अधीक्षक प्रशांत आरगे, दिलीप पारसे, अरुण देशिंगे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना गटनेते उदयसिंग पाटील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा