ICHMH51NEWS.IN
9921600800

वीज सवलत ऑनलाइन नोंदणीतील अडचणींबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट; वेबसाइट तातडीने सुरू करण्याचे आदेश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वीज सवलत ऑनलाइन नोंदणीतील अडचणींबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट; वेबसाइट तातडीने सुरू करण्याचे आदेश

इचलकरंजी:
वीज सवलतीसाठीच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत येत असलेल्या तांत्रिक अडचणी, भाडेकरू यंत्रमागधारकांचे प्रश्न तसेच इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली पॉवरलूम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शिष्टमंडळात पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व उपाध्यक्ष रफिक खानापूरे यांचा समावेश होता. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी १३ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीनुसार यंत्रमागधारक ऑनलाइन नोंदणी करत असताना २५ जूनपासून वेबसाइट बंद असल्याने अनेकांना अर्ज करता येत नसल्याची बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. वेबसाइटमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून नोंदणी प्रक्रिया सुरळीत सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच २७ एचपीखालील व त्यावरील सर्व वीज ग्राहकांनी केलेल्या ऑनलाइन नोंदणीला स्वतंत्र मंजुरीची अट ठेवू नये, तसेच भाडेकरू यंत्रमागधारकांच्या अर्जांमध्ये येणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय इचलकरंजी येथे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किल्ड वर्कर्स सुरू करणे तसेच वस्त्रोद्योगातून निर्माण होणाऱ्या टेक्स्टाइल वेस्टच्या पुनर्वापराबाबतही बैठकीत चर्चा झाली.
यावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी वीज सवलत नोंदणीसाठीच्या वेबसाइटची क्षमता तातडीने वाढविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. २७ एचपीखालील व त्यावरील सर्व यंत्रमागधारकांच्या नोंदणीची तपासणी नागपूर येथून केली जाईल आणि स्वतंत्र मंजुरीचा प्रश्न राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सर्व यंत्रमागधारकांनी ऑनलाइन नोंदणी करणे सक्तीचे असून नोंदणी न करणाऱ्यांची वीज सवलत बंद केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाडेकरू यंत्रमागधारकांनी आपण भाडेकरू असल्याचे साध्या कागदावरील स्वघोषणापत्र अपलोड करावे, त्याला मान्यता दिली जाईल, असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले.
या बैठकीला वस्त्रोद्योग सचिव अंशू सिन्हा, सहसचिव श्रीकृष्ण पोवार, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, सहआयुक्त गणेश वंडकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासमवेत बैठकीदरम्यानचे छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा