इचलकरंजीतील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी
इचलकरंजी:
शहरातील मुख्य रस्त्यांवरील पादचारी मार्ग (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी तातडीने खुले करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहराध्यक्ष वसंत पोवार यांनी महापौर, महानगरपालिका आयुक्त आणि शहर वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवरील फुटपाथ अतिक्रमणामुळे नागरिकांना वापरता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. फुटपाथवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटवून पादचारी मार्ग त्वरित सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पदपथावर चालणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला असून, या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या अपघातांची जबाबदारी महानगरपालिका व वाहतूक प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





