महापालिका वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम; गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी गौरव सोहळा उत्साहात पार पडला. महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गीत, नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर उत्कृष्ट विभाग, विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कार्यक्षमता, सांघिक कामगिरी, प्रेरणादायी कर्मचारी, उपक्रमशीलता, समर्पित सेवा, विशेष प्राविण्य, उत्कृष्ट सहकार्य अशा विविध गटांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन आराखडा–२०२६ चेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
मनोगतात मान्यवरांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही नागरिकाभिमुख सेवा व समर्पित कामातून शहराच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंतांच्या सत्कारामुळे महापालिकेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याला उत्सवी वातावरण लाभले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना आयुक्त पल्लवी पाटील,महापौर उदय धातूंडे,सतीश मुळीक व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




