रस्ता खुदाईची कामे तात्पुरती थांबवा; प्रथम पॅचवर्कला प्राधान्य : महापौर उदय धातुंडे,स्थायी समिती सभापती सतीश मुळीक
इचलकरंजी :
शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेसह विविध विकासकामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर उदय धातुंडे व स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी शहरातील नव्या रस्ता खुदाईची कामे तात्पुरती थांबवून ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत तेथे तातडीने पॅचवर्क करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.
भुयारी गटार योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्ता खुदाई तात्पुरती स्थगित करून प्रथम उकरलेल्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. तसेच विविध विभागांत सुरू असलेल्या इतर रस्ता खुदाईच्या कामांनाही तात्पुरती स्थगिती देऊन संबंधित कंत्राटदारांकडून तातडीने पॅचवर्क करून रस्ते वाहतुकीस सुरक्षित व सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागातील सर्व सॅनिटरी इन्स्पेक्टर व मुकादम यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उकरलेले, खराब अवस्थेतील तसेच तातडीने पॅचवर्क आवश्यक असलेल्या रस्त्यांची माहिती बांधकाम विभागाला द्यावी, तर बांधकाम विभागातील अभियंत्यांनी त्यानुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक हे या कामांचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक सूचना देणार असून महापौर उदय धातुंडे स्वतः या कामांवर नियंत्रण ठेवणार आहेत. आयुक्त पल्लवी पाटीलही संबंधित विभागांकडून नियमित आढावा घेऊन कामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणार आहेत. नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे महानगरपालिका प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





