मोबाईल व पैशांची मागणी करत तरुणावर लोखंडी घनाने हल्ला; मोबाईल लुटल्याप्रकरणी मोक्यातील आरोपीवर गुन्हा
इचलकरंजी
इचलकरंजीतील भोनेमाळ परिसरात मोबाईल व पैशांची मागणी करत तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाईल लुटल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सितांजय बाळू भिसे (वय २८, रा. लिगाडे मळा, जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश पंडित नरवाडे (रा. शास्त्री सोसायटी, भोनेमाळ, इचलकरंजी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भोनेमाळ येथील शिव ऑटो गॅरेजसमोर फिर्यादी उभे असताना आरोपीने त्यांच्याकडे येऊन मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली. फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगताच आरोपीने त्यांना कानशिलात मारहाण केली. त्यानंतर लोखंडी घनाने पाठीवर वार करून त्यांच्या खिशातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचा Oppo कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.
यावेळी “घटनेची माहिती कोणाला दिली किंवा पोलिसांत तक्रार केली तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपी तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत असून, प्रभारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








