पूराच्या पाण्यातही इचलकरंजी तहानलेली; कट्टीमोळा उपसा बंद,पाणीपुरवठ्यावर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांची टीका
इचलकरंजी:
पंचगंगा नदीला पूर येऊन नदी दुथडी भरून वाहत असतानाही इचलकरंजी शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
पाटील म्हणाले, “एकीकडे पंचगंगा नदीत मुबलक पाणी उपलब्ध आहे, तर दुसरीकडे शहरवासीयांना एक दिवसाआडही सुरळीत पाणी मिळत नाही. ही प्रशासनाची मोठी अपयशाची बाब असून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.”
सध्या शहराला मजरेवाडी आणि पंचगंगा नदीवरील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कट्टीमोळ येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र पाणी उपसा केंद्र उभारण्यात आले होते. हे केंद्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद अवस्थेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली योजना वापरात नसल्याने सार्वजनिक निधी वाया जात आहे. ऐन पावसाळ्यात नदीला पूर आलेला असतानाही नागरिकांना तीन-चार दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे,” असेही पाटील म्हणाले.
बंद असलेले कट्टीमोळ पाणी उपसा केंद्र तातडीने सुरू करून शहराला नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, तसेच वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी गटनेते शिवाजी पाटील, रतन वाझे, मंथन मुदगल यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारली नाही, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पाहणी करताना गटनेते उदयसिंग पाटील व शिवाजी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







