ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत मराठी उद्योजकांचा भव्य मेळावा होणार; प्राथमिक तयारीला सुरुवात इचलकरंजी :

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत मराठी उद्योजकांचा भव्य मेळावा होणार; प्राथमिक तयारीला सुरुवात

इचलकरंजी :

इचलकरंजी व परिसरातील मराठी उद्योजकांना उद्योगवाढीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मुंबईच्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळवून देण्याच्या उद्देशाने लवकरच १,००० मराठी उद्योजकांचा मार्गदर्शन व प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्राथमिक तयारी सुरू झाली असून त्यासाठी मराठी अभ्यास केंद्र, उत्कर्ष उद्योजक संस्था आणि ऋग्वेद फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास केंद्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी सोमवारी (दि. ६) इचलकरंजीला भेट देऊन वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी आणि खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रातील विविध मराठी उद्योजकांशी संवाद साधला. इचलकरंजीत उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री प्रामुख्याने दलालांमार्फत होत असल्याने उत्पादकांना योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत मराठी उद्योजकांची थेट उपस्थिती वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही मत व्यक्त झाले.

या भेटीदरम्यान गंगा साडी फॉलचे राजू मलकापुरे, श्री कृपा इंडस्ट्रीचे संतोष सुतार, श्री हॉस्पिटलचे धनाजी भाटले आणि ओमकार नमकीनचे राजेंद्र तळेकर यांच्या उद्योगांना भेटी देण्यात आल्या. प्रस्तावित उद्योजक मेळाव्याबाबत त्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. तसेच या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही संबंधित उद्योजकांनी दिली.

यावेळी युवा उद्योजक व सत्वरस सुपर फूड्स प्रा. लि.चे संचालक आदित्य गणेश भांबे यांनाही डॉ. पवार यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात इचलकरंजी शहर व परिसरातील अधिकाधिक मराठी उद्योजकांपर्यंत संपर्क अभियानाद्वारे पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे, सचिव अमोल देशपांडे, ऋग्वेद फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश मराठे, मराठी अभ्यास केंद्राचे अमोल गवळी तसेच शिवसेना (उबाठा) व मनसेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगांना भेटी देताना डॉ दीपक पवार,गणेश भांबे,आदित्य भांबे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा