मंजूर ठराव द्या, अन्यथा तीव्र आंदोलन; नगरसचिवांना घेराव, उच्च न्यायालयात जाण्याचा विरोधकांचा इशारा
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या महासभा व विशेष महासभेत मंजूर झालेल्या ठरावांच्या प्रती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसल्याच्या निषेधार्थ शिव-शाहू विकास आघाडीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी गुरुवारी नगरसचिव विभागाचे प्रमुख राहुल पोटे यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी मंजूर ठराव तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
आंदोलनात शिवसेना गटनेते शिवाजी पाटील, नगरसेवक रणजीत जाधव, अमरजीत जाधव, सचिन राणे, नितीन कोकणे, राजू आलासे, गणेश सावरकर, इम्रान हावेरी, रतन वाझे, युवराज शिंगाडे, मच्छिंद्र नगारे, अभिजित रवंदे, प्रकाश खंडाळे यांच्यासह शिव-शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसचिव विभागाकडून महासभेचे मंजूर ठराव वेळेत उपलब्ध करून दिले जात नसल्याने संशय निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला. मंजूर ठराव, इतिवृत्त व संबंधित कागदपत्रांमध्ये विलंब का होत आहे, याबाबत नगरसचिव राहुल पोटे यांना प्रश्न विचारण्यात आले. महासभेतील ठरावांमध्ये कोणताही फेरफार होऊ नये आणि मागणी होताच ते तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, विरोधी पक्षाने २७ जुलै रोजी झालेली विशेष सभा नियमबाह्य असल्याचा गंभीर आरोप केला. सभेच्या हजेरी वहीवर महापौरांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचा दावा करत, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागील तारखांनी सह्या घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जीपीएस टाइम-स्टॅम्प असलेले छायाचित्र पुरावा म्हणून असल्याचाही दावा विरोधकांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार विभागीय आयुक्त, लोकायुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिली. नगरसचिवांवर कारवाई करून कथित बेकायदेशीर ठराव रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
शिव शाहू विकास आघाडीच्या वतीने नगरसचिव राहुल पोटे याना घेराव घालण्यात आला
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





